ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वीणा देव यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक आणि गो.नी. दांडेकर यांच्या कन्या डॉ. वीणा विजय देव यांचे निधन झाले.
डॉ. वीणा देव
डॉ. वीणा देव
Published on

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक आणि गो.नी. दांडेकर यांच्या कन्या डॉ. वीणा विजय देव यांचे निधन झाले. त्या ७६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे दोन मृणाल, मधुरा या कन्या व जावई, नातू, नातसून असा परिवार आहे.

गेल्याच वर्षी त्यांचा अमृतमहोत्सव साजरा झाला होता. त्यांच्या जाण्यानं साहित्य क्षेत्रावर दुःखद छाया पसरली आहे. आज संध्याकाळी त्यांना सहकार नगर येथील मानसमध्ये दर्शनासाठी आणणार आहेत. त्यानंतर रात्री ९ च्या सुमारास पुढील विधी केले जातील, असे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.

डॉ. वीणा विजय देव या प्रसिद्ध साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत. पुण्यातील शाहू मंदिर महाविद्यालयात त्यांनी मराठी विभागप्रमुख काम केले. तेथे त्यांनी ३२ वर्षे अध्यापनाचं कार्य केले. मराठी कथा-कादंबऱ्यांची नाट्यरूपे या विषयावर सादर केलेल्या प्रबंधासाठी त्यांना पीएच.डी. ही पदवी मिळाली. लेखन, संकलन आणि संपादन हे साहित्याचे विविध प्रकार त्यांनी लीलया हाताळले असून, या संदर्भातील त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.

'कधीकधी', 'परतोनी पाहे', 'स्त्रीरंग', 'विभ्रम', 'स्वान्सीचे दिवस' हे त्यांचे लेखसंग्रह वाचकप्रिय आहेत. 'स्मरणे गोनिदांची' हा स्मरणग्रंथ आणि यशवंत देव आणि डॉ. ह. वि. सरदेसाई यांची वीणा देव यांनी संपादित केलेली दोन पुस्तकं आहेत. तसेच त्यांनी गो. नी. दांडेकर यांच्यावर लिहिलेल्या 'आशक मस्त फकीर' या व्यक्तिचित्रास महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट

ललित साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळाला. तसेच महाराष्ट्र शासनाच्या मराठी राजभाषा सल्लागार समितीच्या त्या माजी सदस्य राहिल्या आहेत. साहित्य आणि कला क्षेत्रात विविध विषयांवर अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिली आहेत. मुलाखती घेणे, सूत्रसंचालन याद्वारे त्यांचा आकाशवाणी, दूरदर्शनवर सहभाग राहिला आहे. १९७५ पासून गो. नी. दांडेकर लिखित विविध कादंबऱ्यांच्या अभिवाचनाचे ६५० हून अधिक कार्यक्रम त्यांनी केले आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या वीणा देव यांच्या कन्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in