डॉ. रवींद्र शोभणे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव

पुरस्काराचे स्वरूप अनुक्रमे ५ लाख व २ लाख रुपये रोख रक्कम, मानचिन्ह, मानपत्र असे आहे.
डॉ. रवींद्र शोभणे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव

मुंबई : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांना यंदाचा ‘विंदा करंदीकर जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे, तर मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांना कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

या पुरस्काराचे स्वरूप अनुक्रमे ५ लाख व २ लाख रुपये रोख रक्कम, मानचिन्ह, मानपत्र असे आहे. श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशक पुरस्कार मनोविकास प्रकाशनास मिळाला आहे. मराठी साहित्य, वाङ‌य क्षेत्रात तसेच मराठी भाषा संवर्धनासाठी लक्षणीय कामगिरी करणाऱ्या आणि मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मिती करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना मराठा भाषा विभागाच्या वतीने २०२३ या वर्षासाठीचे विविध पुरस्कार शुक्रवारी जाहीर करण्यात आले. मराठा भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली. येत्या २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनी या पुरस्कारांचे वितरण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांना ‘विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार’, तर मराठी साहित्य निर्मितीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुणे येथील मनोविकास प्रकाशन या संस्थेस श्री. पु. भागवत पुरस्कार जाहीर करण्यात आला. या संस्थेस ३ लाख रुपये रोख रक्कम, मानचिन्ह व मानपत्र देण्यात येणार आहे. डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ. प्रकाश परब व बेळगाव येथील वाड्मय चर्चा मंडळ या संस्थेस जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर कौतिकराव ठाले-पाटील व नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठान या संस्थेस कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार देण्यात येणार आहे. उत्कृष्ट मराठी वाङ‌्मय निर्मिती करणाऱ्यांसाठी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारही जाहीर केले आहेत. .

logo
marathi.freepressjournal.in