कराड : कराड तालुक्यातील पाचपुतेवाडी (तुळसण) येथे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने कारवाई करत सुमारे ७०० ग्रॅम मेफेड्रोन ड्रग (एमडी) या अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. या अमली पदार्थाची किंमत ६ हजार कोटी रुपये आहे. या प्रकरणी डीआरआयच्या पथकाने चौघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईने सातारा जिल्ह्यातील ड्रग्ज माफियांसहअवैध धंदेवाल्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
शनिवारी रात्री उशिरा गुप्तपणे राबवलेल्या या मोहीमेसाठी महसूल गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी तीन वाहनांमधून पाचपुतेवाडी परिसरात दाखल झाले. त्यांनी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मागील बाजूच्या बंदिस्त शेडवर छापा टाकला. या ठिकाणी मेफेड्रोन हा अंमली पदार्थ तयार केले जात असल्याचे आढळले. पथकाने बंदिस्त शेड सील केली.
सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थांचे निर्मिती, विक्री व मोठे साठे यापूर्वीही सापडले होते. यापूर्वी सावरी-बामनोली परिसरात मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने ५० कोटींचे मेफेड्रोन ड्रग पकडले होते. त्या प्रकरणावरून मोठे राजकीय वादंगही निर्माण झाले होते.
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी म्हणाले की, या कारवाईशी सातारा पोलिसांचा कोणताही संबंध नाही. ही कारवाई महसूल गुप्तचर यंत्रणेची (डीआरआय) असून त्यांनी जिल्हा पोलिसांना कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.