ऐन उन्हाळ्यातही कोयना धरणात मुबलक पाणीसाठा; पूर्वेकडील पाण्याची मागणी वाढल्याने कोयना नदीत ३ हजार क्युसेक विसर्ग सुरू

राज्यातील धरणात सध्या कडक उन्हाळ्यामुळे पाणीपातळी घटली असताना कोयना धरणात मात्र मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे.राज्यात सध्या उन्हाळाची तिव्रता प्रचंड वाढली आहे. परिणामी,कोयना-कृष्णा काठांवरील योजनांना पुरेसा पाणीसाठा होत नाही.
ऐन उन्हाळ्यातही कोयना धरणात मुबलक पाणीसाठा; पूर्वेकडील पाण्याची मागणी वाढल्याने कोयना नदीत ३ हजार क्युसेक विसर्ग सुरू

कराड : सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने पूर्वेकडील सिंचनासह पिण्याच्या पाण्याची मागणी वाढल्यामुळे राज्याची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाचे रिव्हर स्विस गेट शुक्र. ५ रोजी सायं. ६ वा. उघडून धरणातून प्रतिसेकंद ९०० क्युसेक आणि तत्पूर्वी पायथा वीजगृहातून सुरू असणारे २१०० क्युसेक असा एकूण धरणातून ३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला असल्याची माहिती कोयना सिंचन विभागाच्यावतीने देण्यात आली.

दरम्यान, राज्यातील धरणात सध्या कडक उन्हाळ्यामुळे पाणीपातळी घटली असताना कोयना धरणात मात्र मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे.राज्यात सध्या उन्हाळाची तिव्रता प्रचंड वाढली आहे. परिणामी,कोयना-कृष्णा काठांवरील योजनांना पुरेसा पाणीसाठा होत नाही.त्यासाठी कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची मागणी सांगली पाटबंधारे विभागाने केली होती.त्यानुसार कोयना धरण व्यवस्थापनाने या मागणीचा विचार करून शुक्रवारी सायं. ६ वा.कोयना धरणाचे रिव्हर स्विस गेट उघडून धरणातून ९०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला.या अगोदरच धरणाच्या पायथा वीजगृहातून सध्या २० मेगॅवॅट क्षमतेच्या दोन जनित्रांद्वारे ४० मेगॅवॅट वीजनिर्मिती करून २१०० क्युसेक विसर्ग सुरू होता.आता आणखी ९०० क्युसेक विसर्ग वाढवल्यामुळे एकूण ३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू केला असल्याची माहिती कोयना सिंचन विभागाच्यावतीने देण्यात आली.

कोयना-कृष्णेची पाणीपातळी वाढली!

कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून अगोदरच कोयना नदीपात्रात अगोदरच २ हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असताना आता पूर्वेकडील सिंचनासाठी धरणाच्या रिव्हर स्विस दरवाजातून कोयना नदीपात्रात आणखी ९०० क्युसेक असा एकूण ३००० क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यास सुरू केले आहे.त्यामुळे ऐन कडक उन्हाळ्यात कराडपर्यंत कोयना, तर कराडपासून पुढे कृष्णा नदीतील पाणी पातळीतही वाढ झाली आहे.

धरणात जुलैअखेर पुरेल एवढे पाणी

संपूर्ण राज्यात सध्या कडक उन्हाळ्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून राज्यातील बहुतांशी धरणांतील पाणीसाठ्यात कमालीची पाणीपातळी कमी झाली आहे.मात्र महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरण व्यवस्थापनाच्या उत्तम नियोजनामुळे सध्या मुबलक पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा जुलै महिन्यापर्यंत पाऊस पडला नाही तरी पुरेल एवढा पुरेसा आहे. शनि.६ एप्रिल रोजी सायं. ६ वाजेपर्यंत कोयना धरणाची पाणीपातळी २१०८.०७ फूट इतकी असून धरणात ५१.२० टीएमसी इतका एकूण पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये उपयुक्त पाणीसाठा ४६.०८ टीएमसी इतका आहे.

logo
marathi.freepressjournal.in