पुणे : पुणे विमानतळावर अमली पदार्थांच्या तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून सीमाशुल्क विभागाने सुमारे ७४.५० लाख रुपये किमतीचा ७४५ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. हा गांजा बँकॉकहून पुण्यात आलेल्या विमानाच्या शौचालयात अन्नपदार्थ पाकिटात लपवून आणण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने ३ मार्च २०२६ रोजी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई केली. बँकॉकहून आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे आयएबस-२४१ हे विमान पुढे देशांतर्गत उड्डाणासाठी जाणार होते. याचा फायदा घेत अमली पदार्थ विमानातून बाहेर काढण्याचा डाव आखला होता. सीमाशुल्क विभागाचे प्रधान आयुक्त डी. अनिल यांनी सांगितले की, बाथरूमची तपासणी करत तस्करीचा प्रयत्न उधळून लावला.
असा झाला प्रकार उघड
तपासादरम्यान अधिकाऱ्यांनी विमानातील बाथरूमची तपासणी केली. तेव्हा टिश्यू कॅबिनेटच्या फायबर भागाचे स्क्रू काढून त्यामागील पोकळीत पिवळ्या रंगाची दोन पाकिटे लपवून ठेवलेली आढळली. ही पाकिटे उघडून पाहिली असता त्यामध्ये व्हॅक्युम सीलबंद केलेली आठ छोटी पाकिटे सापडली. त्यामध्ये उच्च दर्जाचा हायड्रोपोनिक गांजा भरलेला होता. जप्त करण्यात आलेल्या या गांजाची अंदाजे किंमत ७४.५० लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सीमाशुल्क विभागाने अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस ॲक्ट १९८५) अंतर्गत हा माल जप्त केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून तस्करीमागील मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू आहे.