पाण्याची चिंता मिटली! दमदार पावसामुळे राज्यातील धरणे भरली; बघा कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

राज्यात यंदा दमदार पाऊस झाल्याने धरणांतील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

पुणे : राज्यात यंदा दमदार पाऊस झाल्याने धरणांतील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. सर्व धरणांमध्ये ८६ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे वर्षभराची पाणी चिंता मिटली आहे. कोकणातील धरणांमध्ये ९४ टक्के पाणीसाठा असून मराठवाड्यातील धरणात ७३ टक्के पाणीसाठा आहे.

सप्टेंबरचा शेवटचा आठवडा सुरू झाला, तरीही राज्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे राज्यात विविध पिके धोक्यात आली आहेत. राज्यामध्ये सप्टेंबरच्या पावसाने सरासरी ओलांडली आहे. आतापर्यंत १०३ टक्के पावसाची नोंद कृषी विभागाने केली आहे.

पुण्यातील धरणे काठोकाठ

पुण्यातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणे मिळून ९९.३१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे या पाणीसाठ्यात आणखी वाढ झाली आहे.

राज्यातील सर्व विभागांमधील मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा ९१ टक्क्यांच्या पुढे आहे. कोकण विभागातील मोठ्या धरणांमध्ये ९८, पुणे विभागात ९७.५०, तर नाशिक विभागातील धरणांमध्ये ९६.५९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे, तर मध्यम प्रकल्पांमध्ये ७३.५४ टक्के पाणीसाठा जमा झाला. मात्र, लघु प्रकल्पांमध्ये पाणीसाठा तुलनेने कमी असून आतापर्यंत ५१.६१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

सप्टेंबरमध्ये जोरदार बॅटिंग

यंदा पावसाने सप्टेंबरमध्येही जोरदार बॅटिंग केली. सप्टेंबरची पावसाची सरासरी ११९.७ मिलिमीटर आहे. संभाजीनगर विभागात सरासरीच्या १३४.१६ टक्के, तर पुणे विभागात एकूण सरासरीच्या ७२.९८ टक्के पाऊस पडला आहे.

महाराष्ट्रात ५ ऑक्टोबरपासून मान्सूनची माघार

मुंबई : येत्या ५ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातून मान्सून माघार घेईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. भारतीय हवामान खात्याच्या मुंबई केंद्राचे वैज्ञानिक सुनील कांबळे म्हणाले की, यंदा मुंबईत २,९०० मिमी पाऊस झाला. सरासरीपेक्षा ६०० मिमी पाऊस अधिक झाला आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या ३ ते ४ महिन्यांत २,३०० मिमी पाऊस पडतो. यंदा २,९०० मिमी पाऊस पडला. येत्या पाच ते सहा दिवसांत पावसाचे प्रमाण कमी होईल. येत्या ५ ऑक्टोबरपासून पावसाची माघार राज्यातून सुरू होईल. मात्र, पावसाचे दिवस वाढूही शकतात. त्यामुळे १० ऑक्टोबरपर्यंत पाऊस राहू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in