धुळ्यात प्रेम संबंधांमुळे रात्री ३ वाजता बहिणीची हत्या करुन पहाटे अंत्यविधी उरकले; पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न उघड

आई व मित्रांसह गावातील लोकाना बहिणीच्या मृत्यूविषयी खोटी माहिती दिली. तसेच पहाटे पाचच्या सुमारास तिच्यावर घाई घाईत अंत्यसंस्कार देखील केले
धुळ्यात प्रेम संबंधांमुळे रात्री ३ वाजता बहिणीची हत्या करुन पहाटे अंत्यविधी उरकले; पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न उघड

धुळे – साक्री तालुक्यात निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सैराटची पुनरावृत्ती झाल्याचे बघायला मिळाले आहे. आरोपी भावाला त्याच्या २२ वर्षीय बहिणीचा प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. तसेच ती पळून जायच्या बेतात असल्याचा राग मनात धरून भावाने बहिणीला मारहाण केली. त्यानंतर तिला गळफास लावून खून केला आणि पहाटे तिचा अंत्यविधी उरकून टाकल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी अत्यंत शिताफीने संशयित भावाला गजाआड केले. संदिप रमेश हालोर (वय २४) असं आरोपी भावाचं नाव आहे.

संदिप हालोरला त्याची बहिण पुष्पाचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे त्याने तिला मारहाण करत गळफास लावला आणि हत्या केली. तसेच पहाटे तिचा अंत्यविधी केला. याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने निजामपूर पोलीस तपास पथकाने हट्टी गाव परिसरात जाऊन बातमीची खातरजमा केली. यावेळी आरोपी संदीप हालोर हा गावातच मिळून आला. दरम्यान, पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपी संदीपला खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, हट्टी गावशिवारातील शिवमेंढा येथे रात्रीचे तीन वाजेचे सुमारास त्याची बहीण पुष्पा रमेश हालोर (वय २२) एका मुलाशी प्रेमसंबंध असल्याने पळून जाण्याच्या बेतात होती. त्याचा राग आल्याने आरोपीने बहिणीच्या अंगावरील साडीची लेस फाडून तिला लिंबाच्या झाडाला फास दिला. तसेच बहिणीचा जीव जाईपर्यंत तेथेच थांबून राहिला.

हत्येनंतर आरोपीने घरी जाऊन बहिण पुष्पाने स्वत:च्या हाताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं भासवलं. त्याने आई व मित्रांसह गावातील लोकाना बहिणीच्या मृत्यूविषयी खोटी माहिती दिली. तसेच पहाटे पाचच्या सुमारास तिच्यावर घाई घाईत अंत्यसंस्कार देखील केले. अंत्यविधी करताना आरोपीने अंगावरील सर्व कपडे तसेच गळफास तयार केलेली साडीची लेस सर्व पुरावे नष्ट केले, अशी माहिती तपास पोलीस अधिकारी, श्रीकांत पाटील यांनी दिली. तसेच आरोपीवर पुरावे नष्ट केल्याचाही ठपका ठेवण्यात आल्याचं नमूद केलं.

यानंतर निजामपूर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा छडा लावत आरोपी भावाला गजाआड केले. साक्री न्यायालयाने आता या खुनी भावाला १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या अशा हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in