पाणीटंचाईने सुरगणा यात्राही थंडावली! कोट्यवधींची उलाढाल थांबली, व्यापारी वर्गात नाराजीचा सूर

सुरगणा तालुक्यात पुरेशा सिंचनाअभावी सत्तर टक्के शेतीकामे ठप्प आहेत. त्यामुळे स्थानिकांचे पिंपळगाव, खेडगाव, दिंडोरी पूर्व भागात, गुजरात राज्यात, सोलापूर जिल्ह्यात आदी ठिकाणी रोजगारानिमित्ताने स्थलांतर होत आहे.
पाणीटंचाईने सुरगणा यात्राही थंडावली! कोट्यवधींची उलाढाल थांबली, व्यापारी वर्गात नाराजीचा सूर

हारून शेख/लासलगाव

तीव्र पाणीटंचाई, शेतमजुरांचे स्थलांतर व उष्णतामानाने दुर्गादेवी उत्सवानिमित्ताने भरणारी सुरगणा शहरातील यात्रा यंदा नागरिकांच्या प्रतिसादाअभावी थंडावल्याचे पाहायला मिळत आहे. या यात्रेत दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असली तरी यंदा ती रोडावल्याने व्यापारवर्गात नाराजीचा सूर आहे.

सुरगणा देवीच्या यात्रेची दरवर्षी आदिवासी बांधव मोठ्या आशेने व अपेक्षेने वाट पाहत असतात. नवनव्या कपड्यांची खरेदी करणे, उंच पाळण्यात बसण्याचा आनंद लुटणे, मौत का कुआचा थरार पाहणे यात स्थानिक नागरिक हरखून जात असतात. तथापि, यंदा या भागावर दुष्काळाचे सावट असल्याने साऱ्यांचाच हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे.

सुरगणा तालुक्यात पुरेशा सिंचनाअभावी सत्तर टक्के शेतीकामे ठप्प आहेत. त्यामुळे स्थानिकांचे पिंपळगाव, खेडगाव, दिंडोरी पूर्व भागात, गुजरात राज्यात, सोलापूर जिल्ह्यात आदी ठिकाणी रोजगारानिमित्ताने स्थलांतर होत आहे. स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती करण्यासोबतच स्थानिक मजुरांचे स्थलांतर रोखण्याची जबाबदारी स्थानिक राज्यकर्त्यांची आहे. तथापि, ही जबाबदारी पार पाडली जात नसल्याने शेतमजुरांचे, कामगारांचे स्थलांतर सुरू आहे. परिणामी, अनेकांनी सुरगणा यात्रेकडेच पाठ फिरवली आहे. काही व्यापारी बांधवांनी यात्रा भरगच्च होणार या आशेने माल उधारीवर भरला होता; परंतु गिऱ्हाईक नसल्याने न विकलेला माल शिल्लक राहिल्याने व्यापारी वर्गात नाराजीचा सूर असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवार बाजाराचा दिवस, शनिवार उबरठाण बाजार तसेच आहवाल येथे सलग पाच ते सहा दिवस आहवा येथे डांगदरबार भरत असल्याने यात्रेकरूंची संख्या रोडावली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in