
गिरीश चित्रे / मुंबई
कैद्यांना आपल्या कुटुंबीयांशी संवाद साधण्यासाठी राज्य सरकारने ई-प्रिझन प्रणाली अंमलात आणली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून १ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान राज्यातील विविध कारागृहातील ३ लाख १६ हजार ६४७ कैद्यांनी आपल्या कुटुंबीयांशी संवाद साधला आहे. कैद्यांशी संवाद साधण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेली ई-प्रिझन प्रणाली कुटुंबीयांसाठी उपयुक्त ठरत असून कारागृहापर्यंत जाण्याचा त्रास कमी झाला आहे.
राज्यातील विविध कारागृहात कैदी असून त्यांना भेटण्यासाठी कुटुंबीय वकिलांना पूर्वी मुलाखत नावनोंदणीसाठी नातेवाईकांना दूरवरून प्रवास करून कारागृहाबाहेर वाट पहावे लागायचे. आता कैद्यांसोबत मुलाखत घेण्यासाठी नातेवाईक काही दिवस आधीच ई-प्रिझन प्रणालीद्वारे नोंदणी करतात.
राज्यातील कारागृहांत १,१०५ पेक्षा अधिक विदेशी बंदी असून अनेक दिवसांपासून किंवा वर्षांपासून त्यांचा आपले कुटुंबीय, आई-वडील, मुले-मुली यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नव्हता. परंतु ही सुविधा सुरू झाल्यामुळे विदेशी बंद्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद होत आहे. त्यांच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल होत आहे.
अनेक वर्षांनंतर आपल्या कुटुंबीयांशी ई-मुलाखतीद्वारे संवाद साधताना विदेशी कैद्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना दिसून येत आहे.
कैद्यांना ही सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे जास्तीत जास्त कैद्यांच्या नातेवाईकांचा या सुविधेकडे कल दिसून येत आहे. त्यामुळे कैद्यांच्या कुटुंबीयांच्या प्रत्यक्ष संवादासाठी येण्याच्या खर्चात बचत झाली आहे.
या सुविधेच्या अंमलबजावणीबाबत पुणे येथील कारागृह व सुधारसेवेचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक प्रशांत बुरडे, विशेष पोलीस महानिरीक्षक (मुख्यालय) डॉ. जालिंदर सुपेकर यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन होत आहे.