उमरखेड : मराठवाड्याच्या काही भागांत गुरुवारी सकाळच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता ३.६ व ४.५ रिश्टर स्केल नोंदली गेली. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड खंड एकमधील काही भागात या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या संकेतस्थळावर या भूकंपाची नोंद घेण्यात आली आहे.
उमरखेड तालुक्यात काही भागांत धक्के जाणवल्याच्या वृत्तास प्रशासनाने दुजोरा दिला. सकाळी सहा ते साडेसहा वाजताच्या सुमारास उमरखेड तालुक्यातील उमरखेड खंड-१ मधील काही भागांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
भूकंपाची तीव्रता अधिक नसली तरी जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अनेकांनी घरातून बाहेर पडत मोकळ्या जागेत आसरा घेतला. तालुक्यातील या धक्क्यांची नोंद प्रशासनाने घेतली असून कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जाऊ नये, सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.