मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ : पियुष गोयल यांच्यासाठी सोपी वाट

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ बघायला गेला तर भाजपचा बालेकिल्लाच आहे.
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ : पियुष गोयल यांच्यासाठी सोपी वाट

- मंदार पारकर

कल मतदारसंघाचा

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ बघायला गेला तर भाजपचा बालेकिल्लाच आहे. मुंबई किंवा महाराष्ट्रातील भाजपसाठीचा हा सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ मानला तर आश्चर्य वाटायला नको. भाजपने यासाठीच ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार असलेल्या पियुष गोयल यांना या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत उतरविले आहे. पियुष गोयल यांना तिकीट देताना भाजपाने या मतदारसंघातील दोनवेळा खासदार राहिलेल्या गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापले आहे. गोयल यांच्यासमोर काँग्रेसच्या भूषण पाटील यांना तिकीट देण्यात आले आहे. भूषण पाटील यांना म्हणा किंवा काँग्रेस आणि महाविकास आघाडीला जर या मतदारसंघातून विजयी व्हायचे असेल तर फार कडवी लढत द्यावी लागेल.

पियुष गोयल हे आपल्या ३५ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत पहिल्यांदाच थेट जनतेतून निवडणूक लढवत आहेत. गोयल हे सनदी लेखापाल म्हणजेच सीए आहेत. पेशाने ते इन्व्हेस्टमेंट बँकरही आहेत. राजकारण त्यांच्याकडे वारश्यानेच चालत आले आहे. त्यांचे वडील वेदप्रकाश गोयल हे तब्बल दोन दशके भाजपचे कोषाध्यक्ष राहिले आहेत. वाजपेयी सरकारमध्ये ते मंत्री देखील होते. पियुष गोयल यांच्या मातोश्री चंद्रकांता गोयल या मुंबईतून तीन वेळा आमदार राहिल्या आहेत. पियुष गोयल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खास मर्जीतले आहेत. २०१० साली भाजपने त्यांना पहिल्यांदा महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविले. ते तीनवेळा राज्यसभेवर गेले आहेत. २०१४ साली ते कोळसा मंत्री होते. सुरेश प्रभूंच्या राजीनाम्यानंतर २०१७ मध्ये ते रेल्वे मंत्री झाले. २०१९ मध्ये ते वाणिज्य आणि उद्योग मंत्री झाले. अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे. कोरोना काळात ८० कोटी लोकांना रेशन पुरविण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग राहिला आहे. राज्यसभेत त्यांनी अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे मोदी सरकारला आता लोकसभेत पियुष गोयल यांच्यासारखे स्ट्रॅटेजिस्ट आणि इतर पक्षात चांगले संबंध असणाऱ्या व्यक्ती हव्या आहेत. म्हणूनच गोपाळ शेट्टी यांच्यासारख्या खासदाराचे तिकीट कापून पियुष गोयल यांना या सर्वात सेफ मतदारसंघातून भाजपने लोकसभेच्या रिंगणात उतरविले आहे.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांची परिस्थिती पहायला गेल्यास महायुतीचेच पारडे पूर्णपणे जड आहे. बोरिवलीतून सुनील राणे, दहिसरमधून मनीषा चौधरी, कांदिवली पूर्वेतून अतुल भातखळकर, चारकोपमधून योगेश सागर हे भाजपचे आमदार आहेत. मागाठणेतून शिवसेनेचे प्रकाश सुर्वे आमदार आहेत हे पाचही मतदारसंघ महायुतीकडे आहेत. तर एकमेव मालाड पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसचे अस्लम शेख आमदार आहेत.

हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असल्याने या मतदारसंघातून उभे राहण्यास भाजपमध्ये रस्सीखेच होती. अतुल भातखळकर, सुनील राणे, योगेश सागर यांच्या नावाची चर्चा होती. दरम्यानच्या काळात तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या मतदारसंघातून उभे राहणार अशी जोरदार आवई उठली होती. मात्र भाजपाच्या केंद्रीय रणनितीनुसार पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली. गोयल यांचे नाव आधीच जाहीर झाल्याने त्यांनी प्रचारात देखील आघाडी घेतली आहे. तसेच या मतदारसंघात रा.स्व.संघाचे जाळे चांगले आहे. तसेच गोपाळ शेटटी यांचे गेल्या दोन टर्ममधील काम देखील गोयल यांच्यासाठी जमेची बाजू आहे.

दुसरीकडे काँग्रेसने भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गोयल यांच्यापेक्षा थोडया उशीरानेच पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भूषण पाटील यांना मोठया आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. भूषण पाटील हे स्थानिक आहेत. मराठी आहेत, त्यांचा स्थानिक जनतेत थेट संपर्क आहे. तसेच उदधव ठाकरे यांच्याबददल मराठी मतदारांच्या मनात असलेली सहानुभूती या भूषण पाटील यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. मात्र त्यांना विजय मिळवायचा असेल तर भाजपाचे गेल्यावेळचे ४ लाख ६५ हजारांचे लीड तोडण्याचे महाकाय काम करावे लागणार आहे. या मतदारसंघात गुजराती-मारवाडी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. गोयल यांना या मतांचा फायदा निश्चित होणार आहे. त्यातच मनसेने महायुतीला पाठिंबा दिला आहे. मनसेचीही चांगली मते या मतदारसंघात आहेत. २००९ साली मनसेच्या मतविभाजनामुळेच संजय निरूपम यांचा विजय झाला होता. त्यामुळे ही बहुतांश मराठी मते गोयल यांच्या पारडयात जातील. रेल्वेच्या, स्थानिक वाहतुकीच्या समस्या, झोपडपटटया, इमारतींच्या पुनर्निमाणाचे प्रश्न आदी मुददयांवर पाटील हे गोयल यांची कोंडी करू शकतात. त्यामुळे पियुष गोयल यांच्यासाठी सध्या तरी केकवॉक असलेल्या या मतदारसंघात उदधव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेचे अगदी तळागाळापर्यंत पोहोचलेले नेटवर्क आणि काँग्रेसची पारंपारिक मते भूषण पाटील यांना तारतात की गोयल अपेक्षेप्रमाणे विजयी होतात हे ४ जूनलाच स्पष्ट होणार आहे.

मतदारसंघाचा इतिहास

१९८९ च्या निवडणुकीत भाजपचे राम नाईक निवडून आले होते. नाईक यांनी २००४ पर्यंत हा गड राखला होता. २००४ साली काँग्रेसने अभिनेता गोविंदा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून नाईक यांना पराभवाचे पाणी चाखले. पुढच्या वेळी काँग्रेसने संजय निरूपम यांना उमेदवारी दिली, निरूपम यांनीही विजय मिळविला. २०१४ साली मात्र मोदी लाटेत गोपाळ शेट्टी यांनी विजय मिळविला. २०१९ सालच्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा एकदा बॉलिवूड कार्ड खेळत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना रिंगणात उतरविले. मात्र गोपाळ शेट्टी यांनी तब्बल साडेचार लाख मतांच्या फरकाने मातोंडकर यांचा पराभव केला. गोपाळ शेट्टी हे देशात सर्वाधिक मते मिळवून विजयी होणाऱ्या खासदारांच्या यादीत सहभागी झाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in