नाशिकरोड व इगतपुरी रेल्वे स्थानकात "ईट राईट" मोहीम

ईट राईट ही योजना फक्त मोठ्या उपाहारगृहांसाठीच नाही, तर छोट्या विक्रेत्यांसाठी देखील असणार आहे.
नाशिकरोड व इगतपुरी रेल्वे स्थानकात "ईट राईट" मोहीम

रेल्वे प्रवासात तसेच स्थानकांवर चांगले अन्न मिळावे, अन्न मिळण्याची जागा स्वच्छ असावी, आरोग्याला पोषक वातावरण असावे यासाठी भारतीय खाद्य सुरक्षा मानक प्राधिकरण (एफएसएसएआय), अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) महाराष्ट्र शासन आणि रेल्वेचा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मध्य रेल्वेच्या नाशिकरोड आणि इगतपुरी रेल्वे स्टेशनवर 'ईट राईट स्टेशन' मोहीम राबविली जाणार आहे. यामुळे या दोन स्थानकांवर लवकरच सात्विक, शुद्ध अन्न प्रवाशांना मिळणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी गुणवत्तापूर्वक खाद्य मिळावे यासाठी पुढाकार घेतला आहे. सर्वाधिक गर्दीचे आणि महत्त्वाचे असणारे नाशिक आणि इगतपुरी स्थानकातून लाखो प्रवाशांची वर्दळ प्रतिदिन सुरु असते. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करत या दोन्ही स्थानकांवर येत्या काही दिवसात गुणवत्तापूर्ण जेवण, नाश्ता मिळणार आहे. अलीकडेच एफएसएसएआय आणि अन्न औषध प्रशासनाच्या नाशिक येथील अधिकाऱ्यांनी या दोन्ही स्थानकांवर 'ईट राईट स्टेशन' योजना लागू करण्याबाबत बैठक घेतली. यात हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, भारतातील पहिले ईट राईट स्टेशन प्रमाणपत्र मिळविण्याचा मान मुंबई सेंट्रल स्थानकाला मिळाला असून त्यानंतर चंदीगड, दिल्ली, बडोदा या स्थानकांनाही हा मान मिळाला आहे.

'ईट राईट' म्हणजे काय?

भारतातील बहुतांश रेल्वे स्थानकांवर स्वच्छ व सात्विक अन्न मिळत नाही, अशी तक्रार केली जाते. ही प्रतिमा बदलण्यासाठी ''ईट राईट'' हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये रेल्वे स्थानकांवरचे अन्न हे आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार असेल याची खबरदारी घेतली जाणार आहे. उपहारगृहांमध्ये येणारा कच्चा माल तपासून घेतला जाणार आहे. पदार्थ शिजवताना होणारे रूपांतरण स्वच्छ वातावरणात होते की नाही हे देखील तपासले जाणार असून उपहारगृहांमध्ये काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यासोबत उपहारगृहे हे दर काही तासांनी स्वच्छ होतात की नाही हे देखील तपासले जाणार आहे. ईट राईट ही योजना फक्त मोठ्या उपाहारगृहांसाठीच नाही, तर छोट्या विक्रेत्यांसाठी देखील असणार आहे. फळ विक्रेत्यांकडे असलेली फळेदेखील तपासली जाणार आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in