
मुंबई : लाडक्या गणरायाचे आगमन अगदी काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना गणेश मुर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात यावे, असे आवाहन राज्य सरकार व मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे. यासाठी राज्यात मोहीम राबवण्यात येत असून आराखडा नियोजनबद्ध प्रसिद्धी यासाठी १४ कोटी ७६ लाख ९४ रुपये खर्चास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
लोकमान्य टिळकांनी जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनजागृती व जनतेला संघटित करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा सुरू केली. या निमित्ताने सामाजिक एकोपा आणि संघटनात्मक चळवळी तसेच विविध कला, देखावे आणि सांस्कृतिक उपक्रम यांच्याद्वारे देशहिताचा व्यापक विचार समाजात रुजवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य झाले.
राज्याच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक परंपरेत गणेशोत्सव हा अत्यंत लोकप्रिय आणि राज्याची देशविदेशात सांस्कृतिक ओळख निर्माण करून देणारा असा उत्सव आहे. गणेशोत्सव काळात राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन, त्यावर आधारित विविध उद्योग व व्यवसाय यांना चालना मिळत असून राज्यात एकूणच सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक भरभराट होते. त्यामुळे ही परंपरा व संस्कृती जपली जावी, वृद्धिंगत व्हावी, यासाठी गणेशोत्सव हा "राज्य महोत्सव" म्हणून साजरा करण्याची घोषणा मंत्री आशीष शेलार यांनी पावसाळी अधिवेशनात केली.
पर्यावरण पूरक सण साजरा करण्यासाठी इको फ्रेंडली गणेशोत्सव व मूर्ती विसर्जनासाठी राज्यात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी माध्यम आराखडा नियोजनाची लोकांमध्ये प्रसिद्धी करणार असून १४ कोटींच्या खर्चास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.