अनिल देसाई यांची सात तास चौकशी; सादर केलेल्या कागदपत्रांची शहानिशा सुरू

अनिल देसाई यांची सात तास चौकशी; सादर केलेल्या कागदपत्रांची शहानिशा सुरू

टीडीएस लॉगइन आयडी आणि पासवर्डचा गैरवापर करून शिवसेना पक्षाच्या खात्यातून सुमारे ५० कोटींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार अनिल देसाई यांची मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सात तास चौकशी केली.

मुंबई : आयकर विभागासह टीडीएस लॉगइन आयडी आणि पासवर्डचा गैरवापर करून शिवसेना पक्षाच्या खात्यातून सुमारे ५० कोटींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार अनिल देसाई यांची मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सात तास चौकशी केली. या चौकशीत अनिल देसाई यांनी काही कागदपत्रे सादर केली असून त्याची आता पोलिसांकडून शहानिशा सुरू आहे.

निवडणूक आयोगासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना हे नाव आणि पक्षाचे चिन्ह दिले होते. तरीही ठाकरे गटाने आयकर विभागासह टीडीएस लॉनइन आयडी आणि पासवर्डचा गैरवापर करून सुमारे ५० कोटीचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला होता. ३० जानेवारीला शिंदे गटाचे किरण पावसकर, बालाजी किणीकर, संजय मोरे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन याची चौकशी करण्याची विनंती केली होती. या तक्रार अर्जानंतर पोलीस आयुक्तांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सोपविला होता. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर आर्थिक गुन्हे शाखेने तपासाला सुरुवात केली होती. मंगळवारी सकाळी पावणेअकरा वाजता अनिल देसाई हे पोलीस मुख्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेत चौकशीसाठी हजर झाले होते. सायंकाळी सहापर्यंत त्यांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात आली. यावेळी त्यांनी पोलिसांना काही कागदपत्रे सादर केली होती. या कागदपत्रांची सध्या पोलिसांकडून शहानिशा सुरु आहे.

सायंकाळी सहा वाजता चौकशीनंतर बाहेर आल्यानंतर अनिल देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स मिळाले होते. त्यामुळे ती मंगळवारी चौकशीसाठी हजर राहिलो होतो. आर्थिक गुन्हे शाखेने जी माहिती मागवली आहे, ती माहिती त्यांना दिली आहे. माझ्याकडून पोलिसांना सहकार्य केले जाणार आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्याच्या निर्देशानुसार आणि पक्ष घटनेनुसार आम्ही काम करत आहोत, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे माझ्याकडे असलेली सर्व माहिती ती पोलिसांना दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in