महाराष्ट्रातील ईडी, सीबीआय सरकारचा पराभव होईल - चेन्नीथला

राज्यातील विभागवार आढावा बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा नुकताच पूर्ण केला आहे.
महाराष्ट्रातील ईडी, सीबीआय सरकारचा पराभव होईल - चेन्नीथला

प्रतिनिधी/मुंबई : कर्नाटकात भाजपने काँग्रेस पक्षाचे सरकार कटकारस्थान करुन पाडले व त्यांचे सरकार स्थापन केले. पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपाचा पराभव केला व काँग्रेसला बहुतमताने निवडून दिले. महाराष्ट्रातील सरकार ही जनतेने निवडून दिलेले नसून ईडी,सीबीआयचे सरकार आहे. आगामी निवडणुकीत जनता या भ्रष्ट सरकारचा पराभव करुन काँग्रेसला विजयी करेल, असा विश्वास महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

टिळक भवन येथे काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आदी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, महाराष्ट्रातील भ्रष्ट युती सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात पुर्णपणे अपयशी ठरले आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम गृहमंत्र्यांचे आहे परंतु “गाडीखाली कुत्रा आली तरी विरोधक राजीनामा मागतील” असे विधान त्यांनी केले. पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखील वागळेंवर हल्ला करण्यात आला, नागपुरात खून, मुंबईत गोळीबाराच्या घटना घडल्या, जनता भयभीत आहे परंतु सरकार, मुख्यमंत्री अथवा गृहमंत्री उत्तर देण्यास तयार नाही. गुन्हेगारांवर कारवाई केली जात नाही, महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत खराब आहे म्हणूनच काँग्रेस पक्षाने राज्यपालांची भेट घेऊन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

राज्यातील विभागवार आढावा बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा नुकताच पूर्ण केला आहे. आता १६ व १७ फेब्रुवारीला लोणावळा येथे शिबीर होत आहे. या शिबीरातही निवडणुकीच्या तयारीवर चर्चा केली जाईल, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे या शिबीराचे ऑनलाईन उद्घाटन करतील. लोकसभा निवडणुका व त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होत आहेत यासाठी महाविकास आघाडी मजबूतपणे मैदानात उतरणार आहे. मविआमध्ये जागा वाटपावरून कसलेही मतभेद नाहीत. दिल्लीत एक व मुंबईत दोन बैठका झाल्या आहेत लवकरच अंतिम निर्णय होईल, असेही चेन्नीथला यांनी सांगितले.

हिंदूंचे सरकार असताना हिंदूंना आक्रोश करण्याची वेळ कशी येते?

राज्यात काही संघटना हिंदू आक्रोश मोर्चा काढत आहेत यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, हिंदूंचे सरकार आले असे भाजपाचेच लोक जाहीरपणे सांगत असतात. दिल्लीत व राज्यातही हिंदूंचेच सरकार आहे मग हिंदू समाजाला आक्रोश मोर्चा का काढावा लागत आहे. या सरकारने महागाई, बेरोजगारी वाढवून हिंदूंचे नुकसान केले आहे. हिंदू धर्माचे चारही शंकराचार्य भाजपा सरकारच्या तानाशाही प्रवृत्तीच्या विरोधात आहेत. प्रभू रामचंद्राच्या नावाखाली भाजपाने जे राजकारण केले त्यावर शंकरार्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विरोध केला आहे. खरे साधू संत हे भाजपाच्या विरोधातच आहेत असेही नाना पटोले म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in