मुंबई : राज्यातील बीड, पुणे, छ. संभाजी नगर आणि नवी मुंबईत ईडीने छापेमारी करण्यात आली आहे. ‘ईडी’कडून ज्ञानराधा मल्टीस्टेट ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि सुरेश कुटे ग्रुपशी संबंधित छापेमारी करण्यात आली आहे. ईडीने सुरेश कुटे ग्रुपशी संबंधित मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ही कारवाई केली आहे. यावेळी महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली असून ती जप्त केली आहेत.
ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेट ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, सुरेश कुटे ग्रुप आणि इतरांच्या विरोधात दाखल तक्रारींनुसार, बीड, पुणे, छ. संभाजी नगर आणि नवी मुंबईत येथे छापेमारी केली. यात ईडीच्या हाती बँक खात्यातील पैसे आणि डिमॅट खात्यातील शेअर्स असे १ कोटी २ लाख रुपयांची मालमत्ता सापडली. ईडीने ही सर्व मालमत्ता तातडीने जप्त केली.
ज्ञानराधा मल्टीस्टेट ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि सुरेश कुटे ग्रुप यांच्याविरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या संस्थांकडून राज्यातील शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. ईडीकडून महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांकडून नोंदवलेल्या विविध गुन्हे दाखल खटल्यांच्या आधारे सुरेश कुटे आणि इतर यांनी एम/एस. ज्ञानराधा मल्टीस्टेट ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. (डीएमसीएसएल) च्या माध्यमात गुंतदारांशी केलेल्या फसवणुकीबाबत तपास सुरू करण्यात आला.