रोहित पवारांच्या ‘बारामती ॲग्रो’वर ईडीची धाड, आव्हाडांचा नाव न घेता अजित पवारांवर निशाणा

रोहित पवारांच्या अडचणी वाढल्या, छापेमारीनंतर महापुरुषांचे फोटो पोस्ट करीत केलेले ट्विट चर्चेत
रोहित पवारांच्या ‘बारामती ॲग्रो’वर ईडीची धाड, आव्हाडांचा नाव न घेता अजित पवारांवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर शुक्रवारी (५ जानेवारी) सक्तवसुली संचालनालयाने धाड टाकली. त्यामुळे रोहित पवारांच्या अडचणी वाढल्याचं चित्र आहे. शुक्रवारी पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली. एकूण ६ ठिकाणी छापेमारी केल्याची प्राथमिक माहिती आहे.

रोहित पवार हे बारामती अ‍ॅग्रोचे सीईओ आहेत. त्यांचे बारामती आणि हडपसर येथे कार्यालय आहे. या दोन्ही ठिकाणी ईडीचे अधिकारी ठाण मांडून आहेत. तथापि, या धाडींबद्दल अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही. अधिकाऱ्यांकडून महत्त्वाच्या कागदपत्रांची छाननी केली जात असल्याचे मात्र समजतेय.

यापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक विभागाने रोहित पवार यांच्याविरोधात कारवाई केली होती. प्रदूषण नियंत्रक विभागाने बारामती अ‍ॅग्रो कंपनीला 72 तासात प्लान्ट बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर रोहित पवारांनी कोर्टात धाव घेतली असता कोर्टाने कारवाईला स्थगिती दिली होती. त्यानंतर आता रोहित पवार यांच्याशी संबंधित पुणे, बारामती आणि इतर अशा सहा ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत.

दरम्यान, रोहित पवार सध्या परदेशात असल्याचे वृत्त आहे. छापेमारीनंतर त्यांनी महापुरुषांचे फोटो पोस्ट करीत केलेले ट्विट चर्चेत आहे. "हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा... ज्यांनी पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला...अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल." असे सूचक ट्विट रोहित पवारांनी केले आहे.

दरम्यान, या कारवाईमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना अजित पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.

"रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर ED ची धाड पडल्याची बातमी समजली. पवार साहेबांच्या सोबत निष्ठेने आणि ताकदीने उभे राहण्याचे हे फळ आहे. वाईट याचेच वाटते की, यात आपलेच "घरभेदी" सहकारी सामील आहेत", अशी पोस्ट करत आव्हाडांनी अजित पवारांवर नाव न घेता टीका केली. याशिवाय, "रोहित या सर्व दबावतंत्राला बळी तर पडणारच नाही, उलट अजून ताऊन सुलाखून बाहेर पडेल", असा विश्वासही व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in