बारामती ॲग्रोवर ईडीची छापेमारी; सहा ठिकाणच्या कार्यालयांत दिवसभर चौकशी

२००१ ते २०११ या काळात २३ सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेने तारण न घेता कर्जे दिली होती.
बारामती ॲग्रोवर ईडीची छापेमारी; सहा ठिकाणच्या कार्यालयांत दिवसभर चौकशी

पुणे : कथित गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची कंपनी असलेल्या बारामती ॲग्रोच्या कार्यालयांवर शुक्रवारी ईडीने छापेमारी केली आहे. गेल्या वर्षी रोहित पवार यांना याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. आता बारामती ॲग्रोच्या बारामती, मुंबईसह सहा ठिकाणच्या कार्यालयांवर ईडीने छापेमारी केली.

२००१ ते २०११ या काळात २३ सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेने तारण न घेता कर्जे दिली होती. ही कर्जे एनपीएमध्ये गेली. त्यानंतर ते कारखाने नेत्यांनी विकत घेतले. त्यासाठी पुन्हा शिखर बँकेनेच कर्जे दिली. यामध्ये बँकेला एकूण २ हजार ६१ कोटी रुपयांचा फटका बसला होता. अजित पवारांचे निकटवर्तीय राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव पाटील राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना बहुतेक कर्ज दिले गेले होते. याच बँकेकडून बारामती ॲग्रोने मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले होते. याच प्रकरणात २०१९ मध्ये मुंबई पोलिसांनी अजित पवारांना अटक केली होती. त्याचबरोबर इतर ७० जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. परंतु, महानगर दंडाधिकारी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात ईडीकडून बारामती ॲग्रोच्या सहा कार्यालयांवर गुरुवारी छापेमारी केल्याची माहिती आहे.

आमदार रोहित पवार यांनी याबाबत सूचक ट्विट केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, ‘हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा. ज्यांनी पिढ्यान‌पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला. अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल...’

सहा ठिकाणी छापेमारी

बारामती ॲग्रो कंपनीचे बारामती तालुक्यातील पिंपळी येथे मुख्य कार्यालय आहे. गुरुवारी सकाळी तपास यंत्रणा येथे पोहोचली. सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान हे अधिकारी येथे पोहोचले आहेत. मुंबई आणि मुंबईच्या जवळच्या काही ठिकाणीही ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. आधी प्रदूषण महामंडळ आणि साखर आयुक्तांनी बारामती ॲग्रोवर कारवाई केली होती.

...म्हणून रोहित पवार टार्गेट

राष्ट्रवादी काँग्रेसमधून पहिल्यांदाच आमदार झालेल्या रोहित पवारांनी आतापर्यंत उल्लेखनीय काम केले आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाची बाजू सांभाळत रोहित पवारांनी किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला, तर अजित पवार गटाच्या प्रत्येक नेत्याने रोहित पवारांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. यावरून रोहित पवार हे राष्ट्रवादीत डोईजड होत होते का? त्यामुळेच दोन गट पडल्यानंतर सर्वजण त्यांच्यावर तुटून पडले का? असे काही प्रश्न पडतात.

logo
marathi.freepressjournal.in