शिक्षणमहर्षी डी. वाय. पाटील यांचे कोल्हापुरात निधन; वयाच्या ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर शिक्षण, आरोग्य, राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय असा ठसा उमटवणारे व्यक्तिमत्त्व तसेच त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंत पाटील (९१) यांचे मंगळवारी कोल्हापुरात निधन झाले.
शिक्षणमहर्षी डी. वाय. पाटील यांचे कोल्हापुरात निधन; वयाच्या ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
शिक्षणमहर्षी डी. वाय. पाटील यांचे कोल्हापुरात निधन; वयाच्या ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास(Photo-X)
Published on

कोल्हापूर : आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर शिक्षण, आरोग्य, राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय असा ठसा उमटवणारे व्यक्तिमत्त्व तसेच त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंत पाटील (९१) यांचे मंगळवारी कोल्हापुरात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातील शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले पण कार्यकर्तृत्वाने विविध क्षेत्रात आपला प्रवास सुरू करून राज्यपाल पदापर्यंत पोहोचलेले डॉ. डी. वाय. पाटील यांच्या जाण्याने एका मोठ्या पर्वाचा अंत झाला आहे. क्रीडा, आरोग्य क्षेत्रातही डॉ. पाटील यांचे महत्त्वाचे योगदान राहिलेले आहे.

विविध शिक्षणसंस्थांचे प्रणेते व त्या माध्यमातून शिक्षणक्षेत्रात भरीव योगदान देणारे डी. वाय. पाटील यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. कोरोना काळानंतर डॉ. डी. वाय. पाटील हे कोल्हापुरातील निवासस्थानी वास्तव्यास होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची प्रकृती हळूहळू ढासळत चालली होती व घरातच त्यांच्यावर उपचार सुरू होते. तथापि, २० दिवसांपूर्वीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र त्यातून ते हळूहळू सावरत होते. अशातच सोमवारी ३ ऑगस्ट रोजी त्यांची प्रकृती खालावत गेली आणि मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

शासकीय इतमामात आज सायंकाळी अंत्यसंस्कार

डॉ. पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बुधवार, ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत त्यांच्या ‘यशवंत निवास’ (कसबा बावडा, कोल्हापूर) येथे ठेवण्यात येणार आहे. यावेळी कोल्हापूरकरांना आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांना आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घेता येईल. नंतर सायंकाळी ४ वाजता यशवंत निवास येथून डॉ. पाटील यांची अंत्ययात्रा निघणार असून, सायंकाळी ५ वाजता डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या (लाईन बाजार, कसबा बावडा) प्रांगणात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. संजय डी. वाय. पाटील, माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, विजय पाटील, डॉ. अजिंक्य पाटील, मुलगी डॉ. नंदिता पालशेतकर आणि नातू ऋतुराज पाटील यांच्यासह मोठा आप्तपरिवार आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in