
पुणे : देशात करण्यात आलेल्या नोटबंदीला आठ वर्षे उलटून गेले आहेत. मात्र,राज्यातील आठ जिल्हा सहकारी बँकांकडे तब्बल १०१ कोटी रुपयांच्या पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या चलनी नोटा पडून असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. या महिन्यात (एप्रिल) याबाबत सुनावणी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
दिनांक ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदी करण्यात आली होती. नोटबंदीनंतर जिल्हा बँका जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा रिझर्व्ह बँकेमध्ये जमा करण्यास गेल्या होत्या. मात्र जागा नसल्याचे कारण सांगत या नोटा स्वत:कडेच ठेवण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेने दिल्या होत्या. नंतरच्या काळात कोणत्याही बँकांकडून जुन्या नोटा जमा करून घेतल्या जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या जिल्हा बँकांकडे १०१ कोटी रुपयांच्या जुन्या चलनी नोटा अद्यापही पडून आहेत.
याबाबत बोलताना विद्याधर अनास्कर म्हणाले, केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीचा निर्णय घेतला. ३० डिसेंबर २०१६ पर्यंत सर्व बँकांनी पाचशे आणि हजाराच्या जुन्या चलनी नोटा रिझर्व्ह बँकेकडे जमा करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. राज्यातील आठ जिल्हा सहकारी बँका मुदतीच्या आधी जुन्या नोटा जमा करण्यास रिझर्व्ह बँकेकडे गेल्या होत्या. मात्र जागा नसल्याचे कारण देत या नोटा तात्पुरत्या स्वरूपात आपल्याकडेच ठेवण्याचे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले. मात्र ३० डिसेंबरनंतर केंद्र सरकारकडून प्रसिद्धीपत्र काढण्यात आले. त्यामध्ये यापुढे कोणत्याही बँकांकडून जुन्या नोटा जमा करून घेण्यात येऊ नये, असे सांगण्यात आले. त्यामुळे या आठ जिल्हा सहकारी बँका सर्वोच्च न्यायालयात गेल्या. या बँकांनी केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता याबद्दल विचार केला जाईल, असे केंद्राकडून सांगण्यात आले.
...तरी रिझर्व्ह बँकेला नोटा बदलून द्याव्या लागतील : अनास्कर
रमेश पोतदार यांनी जुन्या नोटा बदलून देण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या खटल्याचे उदाहरण देत महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अध्यक्ष विद्याधर अनास्कर म्हणाले, ‘‘आठ वर्षे उलटून गेली तरी रिझर्व्ह बँकेला नोटा बदलून द्याव्या लागतील. हे प्रकरण पुन्हा एकदा सुनावणीसाठी घ्यावे, अशी विनंती या बँकांनी केली आहे. त्यानुसार या महिन्यात (एप्रिल) याबद्दल सुनावणी होण्याची शक्यता आहे.’’ दरम्यान, बँकांकडील नोटा मोजताना जुन्या नोटा हिशेबात धरायच्या की नाही याबाबत बँका गोंधळात आहे असे अनास्कर यांनी सांगितले.