आंबोली-मांगेली वनपट्ट्यात ‘आठ’ पट्टेरी वाघांची नोंद; वन विभागाकडून उपाययोजना

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात आंबोली - मांगेली या सह्याद्रीच्या पट्ट्यात तब्बल आठ पट्टेरी वाघ असल्याची नोंद झाली आहे.
आंबोली-मांगेली वनपट्ट्यात ‘आठ’ पट्टेरी वाघांची नोंद; वन विभागाकडून उपाययोजना
Published on

राजन चव्हाण/सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात आंबोली - मांगेली या सह्याद्रीच्या पट्ट्यात तब्बल आठ पट्टेरी वाघ असल्याची नोंद झाली आहे.

राज्याचा वनविभाग,सह्याद्री रिझर्व्ह फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ कंझरवेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त माध्यमातून जानेवारी ते मे (२०२४) दरम्यान 'सह्याद्री टायगर रिझर्व्ह 'आणि कर्नाटकातल्या 'काली टायगर रिझर्व्ह' या दोन्ही ठिकाणी हे सर्वेक्षण हाती घेण्यात आले असता सिंधुदुर्गातील आंबोली - मांगेली या कॉरिडॉरमध्ये ही नोंद झाली आहे.

या वाघांमध्ये ५ मादी व ३ नर वाघांचा समावेश असून वनखात्याने वेगवेगळ्या ठिकाणी बसविलेल्या कॅमेऱ्यात हे सर्व वाघ आणि वाघिणी कैद झाले आहेत. या आधी सुद्धा झालेल्या सर्वेक्षणात या पट्ट्यात वाघांचे वास्तव्य असल्याचे समोर आले होते. काही स्वयंसेवी संस्थानी ठिकठिकाणी लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये या परिसरात वाघांचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले होते. दोन वर्षापूर्वी आंबोली वनक्षेत्र परिसरात वाघ एका गायीला खात असल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. मात्र वन विभागाकडून वाघांचे अस्तित्व या परिसरात असल्याचे नाकारण्यात आले होते. काही महिन्यापूर्वी दोडामार्ग तालुक्यात भेकुर्ली परिसरात दिवसाढवळ्या वाघ वावरत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

वनशक्ती फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने आंबोली - मांगेली हा 'व्याघ्र कॉरिडॉर ' म्हणून संरक्षित व्हावा, यासाठी उच्च न्यायालयात एक सार्वजनिक हिताची याचिका दाखल केली होती व या परिसरात वाघांचे सर्वेक्षण करावे अशी मागणी लावून धरली होती.

संस्थेचे प्रमुख दयानंद स्टॅलिन यांनी या पट्ट्यात तब्बल ५० वाघांचा वावर असल्याचा दावा केला होता. अन्य एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात हे समोर आल्याचेही म्हटले होते. या परिसरात वाघांचे वास्तव्य लक्षात घेता त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनखात्यामार्फत अनेक उपाययोजना करण्यात येणार आहेत. रात्रीची गस्त वाढविण्यात येणार असून कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून शिकारी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

'इको-सेन्सिटिव्ह' म्हणून घोषित

विशेष म्हणजे या दोन तालुक्यातील ज्या गावांमध्ये या वाघांचे वास्तव्य आढळून आले आहे, ती सह्याद्रीच्या रांगांमध्ये असलेली २५ गावे ही 'इको-सेन्सिटिव्ह' म्हणून घोषित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच राज्य शासनाला दिले आहेत. वनखात्याने सर्वेक्षण केल्यानंतर या पट्ट्यात वाघांचे अस्तित्व असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. वनविभागाच्या सर्वेक्षणात वाघांचे वास्तव्य समोर आल्याने आणि इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने वाघांचे अस्तित्व असल्याची नोंद झाल्याने वनविभाग आता सतर्क झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in