एकनाथ खडसेंची भाजपमध्ये घरवापसी? उत्तर महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण

उत्तर महाराष्ट्रात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असताना, ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भाजपमधील संभाव्य घरवापसीच्या चर्चांनी पुन्हा वेग घेतला आहे.
एकनाथ खडसेंची भाजपमध्ये घरवापसी? उत्तर महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण
एकनाथ खडसेंची भाजपमध्ये घरवापसी? उत्तर महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाणसंग्रहित छायाचित्र
Published on

विजय पाठक/जळगाव

उत्तर महाराष्ट्रात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असताना, ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भाजपमधील संभाव्य घरवापसीच्या चर्चांनी पुन्हा वेग घेतला आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी अलीकडेच मुंबईतील खडसे यांच्या निवासस्थानी घेतलेल्या भेटीनंतर या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.

महाराष्ट्रात भाजपच्या विस्तारात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत एकनाथ खडसे यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. २०१४ पूर्वी विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी

प्रभावी भूमिका बजावली होती. मात्र २०१४ मध्ये मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा पूर्ण न झाल्यानंतर आणि भोसरी जमीन व्यवहार प्रकरणामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर त्यांचे पक्षातील महत्त्व कमी होत गेले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र तेथे त्यांचा राजकीय प्रवास अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरला नाही.

दरम्यान, त्यांच्या सून तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या वाढत्या राजकीय प्रभावामुळे खडसे यांच्या पुनरागमनासाठी दिल्ली स्तरावर सकारात्मक वातावरण असल्याची चर्चा सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील काही

स्थानिक नेत्यांचा विरोध असल्याच्या चर्चाही कायम आहेत. अलीकडील विधान परिषद निवडणुकीत नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी मिळाल्यानंतरही विविध राजकीय संकेतांबाबत चर्चा रंगली. महाजन हे खडसे यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

वाढदिवशी होणार मोठी घोषणा?

एकनाथ खडसे यांचा ७५ वा वाढदिवस सप्टेंबरच्या सुरुवातीला मुक्ताईनगर येथे मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याची तयारी सुरू आहे. या कार्यक्रमाला भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त होत असून, त्याच मंचावर खडसे यांच्या भाजपमधील घरवापसीची घोषणा होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र या संदर्भात भाजप किंवा एकनाथ खडसे यांनी अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in