राष्ट्रवादीत खडसेंची घुसमट कायम; आमचे केवळ तात्त्विक मतभेद; मुख्यमंत्री होताच खडसेंनी फडणवीसांबाबतचा सूर बदलला

विधानसभा निवडणूक निकालानंतर रोहिणी खडसे यांचे पानिपत झाल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसे यांची चांगलीच घुसमट होत असल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादीत खडसेंची घुसमट कायम; आमचे केवळ तात्त्विक मतभेद; मुख्यमंत्री होताच खडसेंनी फडणवीसांबाबतचा सूर बदलला
Published on

विधानसभा निवडणूक निकालानंतर रोहिणी खडसे यांचे पानिपत झाल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसे यांची चांगलीच घुसमट होत असल्याचे दिसून येत आहे. तर मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस परत आरूढ झाल्याने सतत त्यांना विरोध करणारा खडसेंचा सूर आता मावळल्याचे चित्र पहावयास मिळत असून आमच्यात केवळ तात्त्विक मतभेद असल्याचा सूर खडसेंनी लावला आहे. कदाचित हे मतभेद उद्या चर्चेतून सुटतीलही, असे सांगत एकनाथ खडसेंनी आपण पुन्हा घर वापसी करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत दिले आहेत. असे असले तरी जिल्ह्यात त्यांना सतत विरोध करणारे गिरीश महाजन हे खडसेंना भाजपच्या जवळ येऊ देतील काय? यावर सारे अवलंबून राहणार आहे. त्यामुळे आधी भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या खडसेंची राष्ट्रवादीतही घुसमट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

एकनाथ खडसे हे एकेकाळचे भाजपचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी भाजपात ४० वर्षे घालवले. भाजपाचे वर्चस्व जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात वाढवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांपैकी एक म्हणजे खडसे. गोपीनाथ मुंडेनंतर एकनाथ खडसे यांनी भाजपाला बहुजनांचा पक्ष म्हणून चेहरा दिला.

आपल्या आक्रमक स्वभावाने विरोधी पक्षनेता म्हणून विधानसभेत दरारा ठेवून एक वेगळी छाप पाडली. त्यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यास आपणच मुख्यमंत्री होणार याची खडसेंना खात्री होती. मोदी लाटेत युतीला महाराष्ट्रात यश मिळाले देखील, पण भाजपा नेत्रुत्वाने मुख्यमंत्रीपदी खडसेंऐवजी देवेंद्र फडणवीस यांची निवड केली. त्यामुळे एकनाथ खडसेंचा अपेक्षाभंग झाला.

ज्येष्ठता डावलली गेल्याची खंत त्यांच्या मनात राहीली. त्यातून देवेंद्र फडणवीसांवर त्यांची टीका सुरू झाली आणि भोसरी प्रकरणात त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. नेहमीच पक्ष मोठा असतो, नंतर कार्यकर्ता असतो, हे लक्षात न आल्याने भाजपाने खडसेंना दूर केले. २०१९ च्या निवडणुकीत देखील भाजपाने खडसेंना तिकीट देण्याचे जाणीवपूर्वक टाळले. अखेरच्या क्षणी त्यांच्याऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसेला भाजपाने तिकीट दिले.

दरम्यानच्या काळात जिल्ह्यात भाजपात खडसे व गिरीश महाजन असे दोन गट पडले होते. फडणवीसांच्या निकटवर्तीयांमध्ये महाजनांचा समावेश झालेला होता. महाजनांनी रोहिणी खडसेंचा पराभव करण्याचे काम चोख केले, यातून खडसे-महाजन वाद अधिक तीव्र झाला. या वादामुळे खडसेंपासून कार्यकर्ते दूर जाऊ लागले. अखेर खडसेंनी भाजपा सोडण्याचा निर्णय घेतला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.

रोहिणीपेक्षा रक्षाचे वर्चस्व अधिक

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी बळकट होईल, ही शरद पवारांची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. दरम्यान, खडसेंच्या प्रकृतीने साथ दिली नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय भाजप नेत्रुत्वाने खडसेंना दिल्लीत बोलावले, पक्षप्रवेश झाल्याचे सांगितले मात्र राज्य नेत्रुत्व, महाजन हे या प्रवेशाच्या विरोधात राहिले आणि भाजपमध्ये प्रवेश झालाच नाही, त्यामुळे एकनाथ खडसेंना अखेर आपण राष्ट्रवादीतच राहणार असे सांगणे भाग पडले. हे नाट्य घडत असतांनाच भाजपाने खडसेंची सून रक्षा खडसे यांना मात्र लोकसभेचे तिकीट देऊन निवडून आणले आणि केंद्रीय मंत्री देखील केले. आज रक्षा खडसे या आपला वेगळा ठसा उमटवून आहेत. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची राजकीय स्थिती पाहता महाविकास आघाडी निवडून येईल, असे मविआच्या नेत्यांना वाटत होते. मुख्यमंत्री चेहऱ्यावरून चर्चा झडत होत्या. त्यामुळे मविआचे सरकार राज्यात येणार याबाबत खडसे निश्चिंत होते. रोहिणी खडसे परत मुक्ताईनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत होत्या. लाडक्या बहिणींनी मविआच्या स्वप्नांवर पाणी फिरवत महायुतीला विक्रमी यश मिळवून दिले. या लाटेत रोहिणी खडसे यांचा पराभव झाला आणि राज्यात महायुतीचे सरकार येऊन भाजपचे देवेंद्र फडणवीस परत पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले. खडसेंसाठी हा मोठा धक्का होता. राष्ट्रवादीचे शकले झाल्याने आता राष्ट्रवादीत भवितव्य नाही, हे खडसे यांनी ओळखले.

खडसेंनी माघार घेतल्याचे चित्र

भविष्यात राजकारणात रहायचे असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही, हे खडसे निश्चित जाणतात. रोहिणी खडसेंचे राजकीय पुनर्वसन त्यांना महत्वाचे वाटते. अशा स्थितीत देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुळवून घेणे हाच एक पर्याय असू शकतो याची त्यांना जाण आहे. त्यामुळेच पत्रकारांशी बोलतांना फडणवीसांशी आजही आपण बोलतो, गप्पा मारतो असे सांगत आपले व त्यांचे काही तात्विक मतभेद असल्याचा सूर लगावला. हे मतभेद मिटले तर सारे ठीक होईल असे सांगत खडसेंनी दोन पावले माघार घेतल्याचे चित्र दिसून आले. जिल्ह्यात कार्यकर्त्यांना देखील खडसे हवे आहेत. मात्र गिरीश महाजन खडसेंना फडणवीस यांच्या जवळ येऊ देतील काय, भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करू देण्यास महाजन तयार होतील काय ? हा खरा सवाल आहे.

logo
marathi.freepressjournal.in