

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगावातील ‘मुक्ताई बंगल्या’त चोरी झाल्याची मोठी घटना उघडकीस आली आहे.
चोरट्यांनी सुमारे साडेसहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ३५ हजार रुपयांची रोकड असा सुमारे सात लाख रुपयांचा ऐवज लांबवला आहे. यासोबतच काही महत्त्वाची कागदपत्रे, सीडी आणि पेनड्राईव्ह देखील गायब झाल्याचे खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यामुळे या चोरीमागील हेतूबाबत गंभीर संशय निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवरामनगर परिसरातील मुक्ताई बंगल्यात सोमवारी मध्यरात्री चोरी झाली. सकाळी साफसफाईसाठी आलेल्या महिला कर्मचारी आणि देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बंगल्यातील दरवाजे उघडे असल्याचे पाहिले. आत प्रवेश केल्यावर कपाटे फोडलेली व वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या. त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथकाच्या साहाय्याने तपास सुरू करण्यात आला असून, काही अंतरापर्यंत कुत्र्याने चोरट्यांचा मागोवा घेतल्याचे समजते. घटनेच्या वेळी एकनाथ खडसे मुंबईत, त्यांची पत्नी मुंबईत, कन्या रोहिणी खडसे पुण्यात तर सून रक्षा खडसे दिल्लीमध्ये असल्याचे सांगण्यात आले. खडसे हे मंगळवारी सकाळी मुंबईहून जळगावला पोहोचले आणि बंगल्यातील पाहणीदरम्यान माहितीच्या अधिकारांतून मिळवलेली काही महत्त्वाची कागदपत्रे, तसेच सीडी आणि पेनड्राईव्हही गायब असल्याचे लक्षात आले.दरम्यान, जळगाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला असून, चोरीतील कागदपत्रे आणि डिजिटल वस्तूंच्या तपासावर विशेष भर दिला जाणार आहे.
सोने आणि रोकडेसोबत काही महत्त्वाची कागदपत्रे, सीडी आणि पेनड्राईव्ह गायब आहेत. त्यामुळे चोरीचा हेतू नेमका काय, याबद्दल संशय निर्माण झाला आहे. जळगाव जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था राहिलेली नाही.सामान्य नागरिकांची मालमत्ता सुरक्षित नाही. पोलीस प्रशासन दडपशाहीत व्यस्त असून चोरी-दरोड्यांचे प्रमाण वाढले आहे. आम्ही पोलीस अधीक्षक व मागील जिल्हाधिकाऱ्यांना याविषयी सूचना दिल्या होत्या, मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.
एकनाथ खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते