खडसे भाजपमध्ये जाणार, कन्या राष्ट्रवादीतच राहणार; रोहिणी खडसेंनी मारले एका दगडात दोन पक्षी

उत्तर महाराष्ट्रात भाजपचे बळ कमी होताना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यातही खासदार भाजपचा होत असला तरी जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद मोठी आहे. राष्ट्रवादीचे नेतेदेखील प्रबळ आहेत. अशा स्थितीत भाजपचे वर्चस्व अधिक भक्कम व्हावे आणि जळगावसह रावेरमध्ये भाजपचे खासदार निवडून यावेत, यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींची जुळवाजुळव सुरू आहे.
खडसे भाजपमध्ये जाणार, कन्या राष्ट्रवादीतच राहणार; रोहिणी खडसेंनी मारले एका दगडात दोन पक्षी

विशेष प्रतिनिधी / मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आता भाजपमध्ये स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. या अगोदर त्यांनी तसे संकेत दिले होते. परंतु त्यांनी आपण येत्या १५ दिवसांत केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत राजधानी दिल्लीत पक्षप्रवेश करणार असल्याचे सांगितले. मात्र, दुसरीकडे त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मात्र, आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्या सध्या राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आहेत. त्यांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे सांगून भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजप पिता आणि कन्येला भाजपात घेऊन राष्ट्रवादीला धक्का देऊ पाहात होते. परंतु रोहिणी खडसे यांनी वेगळी भूमिका घेतली. त्याचा फटका भाजपला बसू शकतो.

उत्तर महाराष्ट्रात भाजपचे बळ कमी होताना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यातही खासदार भाजपचा होत असला तरी जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद मोठी आहे. राष्ट्रवादीचे नेतेदेखील प्रबळ आहेत. अशा स्थितीत भाजपचे वर्चस्व अधिक भक्कम व्हावे आणि जळगावसह रावेरमध्ये भाजपचे खासदार निवडून यावेत, यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींची जुळवाजुळव सुरू आहे. त्यातल्या त्यात जे जुनेजाणते नाराज नेते आहेत. त्यांना जोडण्याचे काम भाजप करीत आहेत. खडसे यांची घरवापसी त्याचाच एक भाग आहे, असे मानले जात आहे. भाजपने खडसे यांच्यासह कन्या रोहिणी खडसे यांच्या पुनर्वसनाचीदेखील तयारी केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

खडसे यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश नाही, तर घरवापसी करीत आहे. ज्या पक्षाला उभारण्याचे काम आपण केले, त्या पक्षात परत जात आहे. आपल्याला शरद पवार यांनी जो सन्मान दिला, त्याबद्दल आभार मानतो, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच त्यांनी आपण का जात आहोत, या कारणाचा उल्लेख आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केला असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे येत्या १५ दिवसांत ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.

logo
marathi.freepressjournal.in