मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीचा परिणाम मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीवर दिसला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला तब्बल १३ कॅबिनेट मंत्री गैरहजर होते, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सलग दोन मंत्रिमंडळ बैठकांना उपस्थित राहिलेले नाहीत. राज्यात २९ महापालिकांच्या निवडणुका होऊन निकाल घोषित झाल्यानंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक २४ जानेवारीला पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्यावर निघून गेले. मुख्यमंत्री दावोसचा दौरा आटोपून आल्यानंतर मंगळवारी मंत्रालयात मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. आजच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह २१ मंत्री उपस्थित होते.
मुख्यमंत्री घेणार सात दिवसांत २२ प्रचारसभा
राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका सध्या सुरू आहेत. परिणामी, अनेक मंत्री या निवडणुकीच्या प्रचारात गुंतले आहेत. त्यामुळे या निवडणुका पार पडेपर्यंत मंत्री मंत्रालयात उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्हा परिषद निवडणुकीत पुढील सात दिवसांत २२ सभा घेणार असून ते २८ जानेवारीपासून कोकणातून आपल्या प्रचारसभांना सुरुवात करतील.
शिंदेंच्याही सातारा जिल्ह्यात सभा, रोड शो
नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे यांनी स्वतःला जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात झोकून दिले आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित न राहता शिंदे यांनी सातारा जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या. जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदे यांच्या जवळपास ३० हून अधिक सभा आणि रोड शो होणार आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या ५ फेब्रुवारीला मतदान होत आहे. त्यामुळे या आठवड्यात मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्री निवडणूक प्रचारात गर्क असणार आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिलेले मंत्री
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हसन मुश्रीफ, गुलाबराव पाटील, उदय सामंत, अतुल सावे, शंभूराज देसाई, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, शिवेंद्रराजे भोसले, भरत गोगावले, मकरंद जाधव पाटील, बाबासाहेब पाटील, प्रकाश आबिटकर