मुंबई : लाडक्या गणरायाचा आगमन सोहळा सुरू झाला असून आगमन व विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवा, असे सक्त आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यां वर कारवाई करा, असा आदेशही त्यांनी दिला. तसेच यंदाही गणेश भक्तांना टोल माफी असेल, अशी घोषणा शिंदे यांनी केली.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. कृत्रिम तलावांची संख्या वाढवा. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन याबाबत उपाययोजना कराव्यात असे निर्देश त्यांनी दिले. गणेशोत्सवानिमित्त कायदा व सुव्यवस्थेचा आढावा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, पोलीस महासंचा लक रश्मी शुक्ला, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पर्यावरण विभागाचे आयुक्त, यावेळी त्या दिले कायम अन्य एक गणेश मार्गावर प्रधान सचिव प्रविण दराडे आदी यावेळी उपस्थित होते. विभागीय जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. राज्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आवश्यक तातडीच्या कामांना प्राधान्य पाहिजे. गेल्या वर्षी ज्या सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी दिली होती ती यावर्षीही राहील, त्यासाठी शुल्क आकारणी करू नये. मंडळांना ज्या परवानग्या लागतात त्यासाठी खिडकी योजना राबवावी. आगमन आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी तातडीने करावी. खड्डे बुजवताना आधुनिक तंत्रज्ञानाने बनविण्यात आलेले साहित्य वापरावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. राज्यातील सर्वच मोठ्या शहरांमध्ये गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्या- साठी रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांना दिले. मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते. अशा ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन याबाबत उपाययोजना कराव्यात, असे ते म्हणाले.
मूर्तिचा पुनरावर्तन उपक्रम राबवा
गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी तैनात केलेल्या अग्निशमन वाहनासाठी कुठलेही शुल्क आकारणी करू नये, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. पुणे येथील एका संस्थेने विसर्जित केलेल्या शाडू मातीच्या मुर्तीचा पुनर्वापराचा प्रयोग केला असून त्यांनी पुनरावर्तन हा उपक्रम सुरू केला आहे. राज्यात सर्वच महापालिकांनी हा उपक्रम राबवावा, असे आवाहन शिंदे यांनी केले.
मंडपासाठी भाड्यात ५० टक्के सवलत
महापालिकेच्या मैदानात, रामलीला मैदानात मंडपासाठी ५० टक्के सवलत दिली जाते, त्याच धर्तीवर गणेश मंडळांना ५० टक्के भाड्यात सवलत देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी सांगितले.