'चर्चा तर होणारच'...एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला; दिल्ली भेटीवरून विरोधकांचा हल्लाबोल

भाजप नेत्यांकडून स्वबळाचा नारा देण्यात येत असल्याने शिवसेनेचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना झाले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली. राजकीय वर्तुळात या भेटीची चांगलीच चर्चा रंगली असून जागावाटपाबाबत शिंदेंनी डाव टाकल्याचे समजते.
'चर्चा तर होणारच'...एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला; दिल्ली भेटीवरून विरोधकांचा हल्लाबोल
Photo : X (Eknath Shinde)
Published on

मुंबई : साताऱ्यातील दरे गावी गेलो तरी चर्चा आणि दिल्लीत गेलो तरी चर्चा, मी काही केले तरी त्याची चर्चा तर होतच राहणार, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला. दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यावरून विरोधकांनी शिंदे यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. त्यावर शिंदे यांनी विरोधकांवर पलटवार केला. मोदींच्या भेटीत नेहमीच आमच्यात विकासाच्या मुद्द्यावर चर्चा होते, असे शिंदे म्हणाले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शनिवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीत त्यांनी मोदींना शाल, पुष्पगुच्छ आणि संत तुकाराम महाराजांची मूर्ती भेट दिली. यावेळी केंद्र आणि राज्यातील विविध विषयांवर दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 'ग्रासरूट लेव्हल'च्या असतात. कार्यकर्त्यांना त्या लढायची इच्छा असते, परंतु अंतिम निर्णय हा वरिष्ठ नेतृत्त्व घेत असते. निर्णय झाल्यावर सर्व कार्यकर्त्यांनी शिस्त पाळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बिहार निवडणुकीत एनडीएचा बोलबाला

बिहार निवडणुकीबाबत शिंदे यांनी सांगितले की, एनडीए गटबंधन निश्चितच तेथे बहुमताने विजय मिळवेल. मुंबई, ठाणे आणि एमएमआरडीए क्षेत्रातील बिहारी बांधवांसोबत बैठका सुरू असून सर्वजण कामाला लागल्याचे त्यांनी नमूद केले. मोदी यांनी बिहारच्या विकासासाठी मोठा निधी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

संत तुकाराम महाराजांची मूर्ती दिली भेट

केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे विकासाची गती वाढली आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि मोदी नेहमी महाराष्ट्रातील संतांचा उल्लेख करतात," असेही शिंदे यांनी सांगितले. कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराजांची मूर्ती भेट दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईसाठी भाजपचा 'दीडशे पार'चा नारा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपने मुंबईसाठी महायुतीसमोर दीडशे जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. दुसरीकडे भाजप नेत्यांकडून स्वबळाचा नारा देण्यात येत असल्याने शिवसेनेचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना झाले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली. राजकीय वर्तुळात या भेटीची चांगलीच चर्चा रंगली असून जागावाटपाबाबत शिंदेंनी डाव टाकल्याचे समजते.

महायुतीत मतभेद होऊ देणार नाही !

शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर हे केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्यावर सातत्याने आरोप करत आहेत. यासंदर्भात शिंदे यांना प्रसारमाध्यमानी विचारले असता, महायुतीत कुठेही मतभेद निर्माण होता कामा नये. कुठेही मिठाचा खडा पडू नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याने महायुती जपली पाहिजे. महायुतीत बेबनाव होईल अशी कोणतीही कृती किंवा वक्तव्य टाळावीत, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, मोहोळ यांच्याविरोधातील वक्तव्यांवर धंगेकर यांच्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न विचारला असता, शिंदे म्हणाले की, धंगेकरांकडे पक्षाचा निरोप पोहोचलेला आहे. त्यांच्या वक्तव्याबाबत त्यांच्याशी चर्चा करेन.

पक्ष वाचवण्यासाठी शिंदेंची दिल्लीवारी - हर्षवर्धन सपकाळ

भारतीय जनता पक्ष ही चेटकीण असून दुसऱ्यांचे पक्ष खाण्याचा रोग या पक्षाला जडला आहे. आधी त्यांनी विरोधी पक्ष खाल्ले, आता मित्रपक्षांना खायला निघाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मित्रपक्षांना स्वबळावर लढायला लावून शिंदे सेना व अजित पवारांच्या पक्षाचा भाजप काटा काढणार हे लक्षात आल्यानेच माझा पक्ष व मला वाचवा, अशी मनधरणी करण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत गेले, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिंदेंवर केली.

logo
marathi.freepressjournal.in