एकनाथ शिंदे ठाम, भाजपला फुटला घाम; मुख्यमंत्री, गृहमंत्रीपदाचा तिढा कायम

विधानसभेचा निकाल लागून महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर राज्यात नवे सरकार सहज स्थापन होईल, या जनतेच्या अपेक्षांना महायुतीत महत्त्वाच्या पदांसाठी सुरू झालेल्या रस्सीखेचमुळे तडा गेला आहे. मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृहमंत्रीपदासाठी अडून बसल्याने भाजप मेटाकुटीला आली आहे.
एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे संग्रहित छायाचित्र
Published on

ठाणे : विधानसभेचा निकाल लागून महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर राज्यात नवे सरकार सहज स्थापन होईल, या जनतेच्या अपेक्षांना महायुतीत महत्त्वाच्या पदांसाठी सुरू झालेल्या रस्सीखेचमुळे तडा गेला आहे. मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृहमंत्रीपदासाठी अडून बसल्याने भाजप मेटाकुटीला आली आहे. केंद्रातील मोदी सरकारचे स्थैर्य शिंदे यांच्या शिवसेनेच्या मदतीवर अवलंबून असल्याने भाजपचे हात दगडाखाली सापडले आहेत. अन्य पक्षातील राजकीय नेत्यांना कोंडीत पकडण्यासाठी भाजपला गृह खाते स्वत:कडे हवे आहे. पण शिंदे यांच्या चाणाक्ष खेळीने भाजप हतबल झाली असून सरकार स्थापन होण्यास त्यामुळे विलंब होत आहे.

दिल्लीतून गृह खाते देण्यास हिरवा कंदील मिळत नसल्याने काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असून ते पुन्हा एकदा आजारी पडले आहेत. शिंदे यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याने त्यांनी दिवसभरातील सर्व बैठका रद्द केल्या आहेत. त्यामुळे महायुतीची बैठकही लांबणीवर पडली आहे. यामागे शिवसेना - भाजपमधील सत्ता संघर्ष कारणीभूत असल्याचे समजते.

अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी याआधीच मुख्यमंत्री भाजपचा होईल, असे जाहीर केले आहे. तरीही भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे नाव पुढे केले जात नाही आणि विधिमंडळ गटनेत्याचीही निवड केली जात नाही. खातेवाटपात शिवसेना अडून बसल्याने भाजपची कोंडी झाली आहे. भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने नुकतेच एकनाथ शिंदे यांनी मूळ गावी जाणे पसंत केले होते. तेथे ते आजारी पडल्यानंतर रविवारी ते ठाण्यात परतले. मात्र, सोमवारी ताप आणि घशाला इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांनी सर्व बैठका रद्द केल्या.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ निवासस्थानी जोरदार घडामोडी घडत आहेत. मंत्रिपदाच्या शर्यतीत असणाऱ्या काही नेत्यांनी सागर बंगल्यावर जाऊन फडणवीस यांची भेट घेतली. त्यात चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर, गिरीश महाजन तसेच माधुरी मिसाळ यांचा समावेश होता. मंत्रिमंडळात कोणाला संधी द्यायची, याचा निर्णय दिल्लीवरून होणार असला तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्रिपदासाठी इच्छुक नेत्यांचे रिपोर्ट कार्ड मागवले आहे. संबंधित मंत्र्याने महायुती सरकारच्या काळात मंत्रालयात कशाप्रकारे कामकाज सांभाळले?, संबंधित मंत्री मंत्रालयात किती वेळ कामकाजासाठी देत होता? महायुती म्हणून आपल्या घटकपक्षातील आमदारांशी या मंत्र्याची वागणूक कशी होती? त्याचबरोबर केंद्राच्या आणि राज्याच्या निधीचा विनियोग कशाप्रकारे केला? संबंधित मंत्र्यामुळे महायुती अडचणीत येईल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती का? वादग्रस्त वक्तव्ये केली का? या मुद्द्यांचे रिपोर्ट कार्ड घेऊन महायुतीच्या नेत्यांना अमित शहा यांनी दिल्लीला बोलावले आहे.

अजित पवार दिल्लीला

एकीकडे भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्यात खातेवाटपावरून जोरदार खडाजंगी सुरू असली तरी ज्या मिळतील त्या जागा पदरात पाडून घ्यायच्या, अशी रणनीती अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आखल्याची चर्चा आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून सर्वात आधी हात वरती करत भाजपला पाठिंबा दिला होता. आता खातेवाटपासंदर्भात भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यासाठी अजित पवार हे सोमवारी दिल्लीला रवाना झाले आहेत. ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या सोबतीने अजित पवार हे सोमवारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतील. फार जोर न लावता अर्थ, सार्वजनिक बांधकाम, कृषी अशी महत्त्वाची खाती पदरात पाडून घेण्याची राष्ट्रवादीची रणनीती दिसत आहे.

सीतारामन, रूपाणी भाजपचे निरीक्षक

भाजपने आपल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानुसार विजय रूपाणी हे मंगळवारी सायंकाळी तर निर्मला सीतारामन बुधवारी सकाळी मुंबईत दाखल होतील. त्यानंतर बुधवारीच भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. त्यात नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची निवड केली जाईल. त्यानंतर ५ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी पार पडेल. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाले असले तरी भाजपकडून शेवटच्या क्षणी धक्कातंत्राचाही वापर केला जाऊ शकतो.

मन वळवण्यासाठी गिरीश महाजन शिंदेंच्या भेटीला

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मन वळवण्यासाठी संकटमोचक गिरीश महाजन यांनी सोमवारी रात्री त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याचे समजते. दुसरीकडे अजित पवार मात्र सरकार स्थापनेविषयी भाजपश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला पोहोचले आहेत. त्यामुळे महायुतीत सत्तासंघर्ष टिपेला पोहोचल्याचे दिसून येत आहे.

शिंदेंना डावलले तर दिल्लीतही फटका?

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदे यांनी माघार घेतली असली तरी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोन महत्त्वाच्या पदांवरून सध्या भाजप-शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजप गृहमंत्रीपद देण्यास इच्छुक नसल्यामुळे आणि शिंदे यांनी आणखीन ताणले तर भाजप-शिवसेनेमधील हा वाद विकोपाला जाऊ शकतो. जर सत्तास्थापनेत एकनाथ शिंदे यांना डावलण्यात आले आणि शिंदेंनी भाजपला केंद्रात आणि राज्यात बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, तर भाजपला त्याचा फटका दिल्लीतही बसू शकतो. एकनाथ शिंदेंच्या बळावर महाविकास आघाडीचे सरकार पाडले आणि आता जास्त जागा निवडून आल्या म्हणून शिवसेनेला विसरले, अशी भाजपची जनमानसात प्रतिमा होऊ शकते.

logo
marathi.freepressjournal.in