राज्यातील कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा समाज आणि त्यांच्या सगेसोयऱ्यांबाबत काढलेल्या अधिसूचनेवरुन अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत. काहींनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. तर, काहींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही यावर भाष्य केले आहे. मराठा आरक्षण मोर्चाचा फायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच होणार असून हवा अशीच राहिली तर त्याचे मतात रुपांतर होईल, असे आंबेडकर म्हणाले. ते माढा येथे ओबीसी महासंघाच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.
एकनाथ शिंदे स्ट्राँग मराठा लीडर
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाद्वारे ज्या मागण्या केल्या त्या मागण्या मान्य करत एकनाथ शिंदे हेच स्ट्राँग मराठा लीडर म्हणून पुढे आहेत. शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे इतर मराठा नेते क्लिन बोल्ड झाले असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
मराठा समाजातील पुढारी झोपलेले-
मराठा समाजामध्ये असणारे नेते, पुढारी झोपलेले आहेत. त्यांच्याबद्दल चीड निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सहानुभूती वाढलेली आहे. एकनाथ शिंदे या सर्वांच्या वर आहेत अशी परिस्थिती आहे, असेही ते म्हणाले.
काँग्रेसच्या ताठरपणामुळे इंडिया आघाडीचे भवितव्य संपले आहे-
इंडिया घटक होता तो आता शिल्लक राहिलेला नाही, त्याचे अस्तित्व राहिलेले नाही. आप बाहेर पडला. जेडीयू बाहेर पडला. टीएमसी बाहेर पडली. काँग्रेसच्या ताठरपणामुळे इंडिया आघाडीचे भवितव्य संपले आहे, असे त्यांनी सांगितले.
इंडिया आघाडीतील प्रमुख पक्षांना राजकीयरित्या धमकावण्याचा प्रयत्न-
एकाच म्यानात दोन तलवारी ठेवण्याचे काम काँग्रेस करत आहे. राहुल गांधी यांच्यामार्फत एकीकडे पक्ष वाढवण्याचे काम सुरु आहे. तर दुसरीकडे खरगे यांना पुढे करण्याचे काम सुरु आहे. पश्चिम बंगाल, बिहार या ठिकाणाहून काँग्रेसची यात्रा जाणार आहे. याठिकाणी प्रमुख असलेल्या तृममूल काँग्रेस आणि जेडीयू यांना समावून घेतले जात नाही. काँग्रेस इंडिया आघाडीतील प्रमुख पक्षांना राजकीयरित्या धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना केला.
इंडिया आघाडीचे झाले ते महाविकास आघाडीत होऊ नये यासाठी प्रयत्न करु-
महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून 30 जानेवारी रोजी चर्चेला येण्याचे निमंत्रण आम्हाला मिळाले असून त्या चर्चेसाठी जाऊन आम्ही आमचे मुद्दे मांडू. काही मुद्द्यांवर मतभेद असतील तर ते चर्चेतून दूर करण्याचा प्रयत्न करु. राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीचे जे झाले ते महाविकास आघाडीत व आमच्यात होऊ नये यासाठी प्रयत्न करु असेही आंबेडकर म्हणाले.