
नाशिक : उत्तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत लक्षणीय यश प्राप्त केल्यानंतर महायुतीतील मोठा भाऊ भाजप विरोधी पक्षांतील बडे मासे गळाला लावत असताना आता शिंदे सेनेनेही आपली तटबंदी भक्कम करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या शिवसेनेने सोमवारी आयोजित केलेली उत्तर महाराष्ट्रस्तरीय बैठक याच रणनितीचा भाग मानला जात आहे. उद्याच्या राजकारणात भाजपने 'एकला चलो रे 'ची भूमिका घेतल्यास आपणही बेसावध राहून चालणार नाही, या जाणीवेपोटी शिंदे सेना अलर्ट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नाशिकसह धुळे, नंदुरबार आणि जळगाव या चार जिल्ह्यांची व्याप्ती असलेल्या उत्तर महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या भाजपची स्थिती अत्यंत भक्कम स्वरुपाची आहे. पाठोपाठ अजित पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि शिंदे सेना असे पक्षीय बलाबल आहे. भाजप नेत्यांच्या अलीकडील पक्षवाढ धोरणाचा विचार करता उद्या स्वराज्य संस्था निवडणुका हा पक्ष स्वबळावर लढण्याच्या मानसिकतेत येऊ शकतो, याची अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांना जाण आहे. शिंदे सेनेचे जळगाव जिल्ह्यात पाच, नाशिक जिल्ह्यात दोन तर नंदुरबारमध्ये एक असे आमदार संख्याबळ आहे. उत्तर महाराष्ट्रात पाच महापालिका, चार जिल्हा परिषदा, नगरपालिका, नगरपंचायती, पंचायत समित्या अस्तित्वात आहेत. यामध्ये प्राबल्य सिद्ध करण्यासाठी महायुतीतील तीनही घटक पक्ष जोर लावणार यामध्ये शंका नाही. यासाठीच या निवडणुकांत महायुती गृहीत न धरता स्वबळाची तयारी करण्याच्या मानसिकतेत एकनाथ शिंदे यांचा पक्ष आहे.
जळगावमध्ये गुलाबराव पाटील तर नाशिकमध्ये दादाजी भुसे यांच्या स्वरुपात शिंदेंचे कॅबिनेट मंत्री आहेत. नाशिक आणि जळगाव शहरी भागात या पक्षाची ताकद दखलपात्र आहे. शिवसेना उबाठा गटाचे अनेक नेते, पदाधिकारी राजकीय सोयीपोटी भाजपइतकीच शिंदे सेनेला पसंती देताना दिसत आहेत. अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी हेदेखील शिंदे सेनेच्या उंबरठ्यावर आहेत. आज झालेल्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय बैठकीत मंत्री उदय सामंत, दादाजी भुसे तसेच पक्ष सचिव संजय मोरे यांनी आमदार, पदाधिकारी आणि प्रमुख नेत्यांची मते जाणून घेतली. त्यामधून उद्या स्वबळावर निवडणुका लढण्याची शक्यता निर्माण झाल्यास काय चित्र असेल, या मुद्द्यावर मंथन झाले. या बैठकीनंतर पक्षनेतृत्व काय निश्चित भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
.. तर भाजप विरुद्ध शिंदेसेना विरुध्द राष्ट्रवादी असा मुकाबला
उत्तर महाराष्ट्रात भाजप भरभक्कम स्थितीत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात ग्रामीण भागात चांगली पकड आहे. शिंदेसेनेचेही आठ आमदार आहेत. 'मविआ'चा विचार करता शिवसेना उबाठा, शरद पवारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि मूळ कॉंग्रेस यांची संघटनशक्ती विकलांग झाली आहे. ही बाब लक्षात घेता उद्या महायुती घटक पक्षांनी स्वतंत्र चूल मांडून निवडणुकांत स्वबळ अजमावले तर अनेक ठिकाणी भाजप विरुध्द शिंदेसेना विरुध्द राष्ट्रवादी असा मुकाबला रंगण्याची शक्यता गडद असणार आहे. तीनही पक्ष सत्तेत असल्याने निवडणूक जिंकण्यासाठी साम-दाम-दंड-भेद वापरणेही अपरिहार्य ठरणार आहे.