एकनाथ शिंदे पुन्हा नाराज? मंत्रिमंडळ बैठकीला दांडी; रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळणार

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्या तसेच बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना १५ ऑगस्टला रायगड जिल्ह्यात झेंडावंदनाचा मान दिल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नाराजीचा सूर आळवला आहे.
एकनाथ शिंदे पुन्हा नाराज? मंत्रिमंडळ बैठकीला दांडी; रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळणार
Published on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्या तसेच बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना १५ ऑगस्टला रायगड जिल्ह्यात झेंडावंदनाचा मान दिल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नाराजीचा सूर आळवला आहे. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही असताना मुख्यमंत्र्यांनी झेंडावंदनाचा मान अदिती तटकरेंना दिल्याने हा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले या दोघांनीही दांडी मारल्याने शिंदे नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे.

अदिती तटकरे यांना झेंडावंदन करण्याचा मान देतानाच, त्याच रायगडच्या पालकमंत्री होतील, असे अप्रत्यक्ष संकेतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळेच गोगावले यांची नाराजी शमवताना एकनाथ शिंदेंना जड जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे १० ऑगस्ट रोजी श्रीनगर दौऱ्यावर गेले असून ते मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र, मंगळवारी दुपारपर्यंत एकनाथ शिंदे मुंबईत दाखल न झाल्याने महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

दरम्यान, सोमवारी रायगड जिल्ह्यात अदिती तटकरे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्याचे परिपत्रक जारी झाले आणि मंत्री गोगावले दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत ते नेमके कोणाला भेटले, काय चर्चा झाली, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, शिंदे यांचा जम्मू-काश्मीरचा नियोजित दौरा असून गोगावले हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेल्याचे शिंदे यांच्या शिवसेनेकडून सांगण्यात आले.

वरिष्ठ नेते निर्णय घेतील!

एकनाथ शिंदे हे रायगडचे पालकमंत्रिपद भरत गोगावले तर नाशिकचे पालकमंत्रिपद दादा भुसे यांना देण्यासाठी आग्रही होते. त्यासाठी अनेकदा दिल्लीवाऱ्या करून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. असे असले तरीही अद्याप भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, असे गोगावले यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in