मुंबई: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीची राज्यात पीछेहाट झाली. राज्यातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याच्या वल्गना करणाऱ्या महायुतीला केवळ १७ जागांवर विजय मिळवता आला, त्याचवेळी महाविकास आघाडीनं मात्र ३० जागांवर विजय मिळवला. देशात स्वबळावर ४०० जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या भाजपला २४० जागाच जिंकता आल्या. त्यानंतर एनडीएतील घटकपक्षांच्या मदतीनं २९३ जागांपर्यंत मजल मारून भाजपनं सरकार स्थापन केलं आणि नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. दरम्यान महाराष्ट्रातील महायुतीच्या अपयशाचं विश्लेषण महायुतीतील प्रमुख नेते करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लोकसभा निवडणूकीतील अपयशाची कारणं सांगितली आहेत. कांद्याने अक्षरशः रडवलं, तर मराठवाडा आणि विदर्भात आम्हाला सोयाबीन आणि कपाशीने त्रास दिला, असं मुख्यमंत्री म्हणाले.
कांद्याने अक्षरशः रडवलं....
रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी पश्चिम भारतातील राज्यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीचं आज (११ जून) मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बैठकीचं उद्घाटन करण्यात आलं. या बैठकीत एकनाथ शिंदे म्हणाले, “नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात आम्हाला कांद्याने रडवलं. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आम्हाला फार त्रास झाला. नाशिकसह आसपासच्या भागात आम्हाला कांद्याने त्रास दिला. कांद्याने अक्षरशः रडवलं. तर मराठवाडा आणि विदर्भात आम्हाला सोयाबीन आणि कपाशीने (कापूस) त्रास दिला.”
विरोधकांनी आमच्याविरोधात अपप्रचार केला...
एकनाथ शिंदे म्हणाले, “गेल्या १० वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर मोठ्या प्रमाणात विकासाची कामं केली आहेत. आम्ही त्यांचं गेल्या १० वर्षांमधील काम पाहिलं आहे. त्यांनी घेतलेले निर्णय आम्ही पाहिले आहेत. आधीच्या ६० वर्षांच्या काळात जे निर्णय घेतले गेले नाहीत ते त्यांनी गेल्या १० वर्षांमध्ये घेतले. मात्र विरोधकांनी आमच्याविरोधात अपप्रचार केला आणि आमचं नुकसान झालं. महाराष्ट्रातही आम्हाला फटका बसला. संविधान बदलणार, आरक्षण जाणार, अशा चर्चा चालू होत्या. मात्र असं काहीच होणार नव्हतं.”