मुंबई : बळीराजा संकटात सापडला आहे, बळीराजाला मदत करणे हेच शिवसेनेचे काम, काही लोक गेले पण व्हॅनिटी व्हॅन घेऊन, त्यांच्यासाठी रॅम्प लागले. शिवसेनेने मदत केली तर फोटो दिसले. फोटोच्या आत काय ते दिसले नाही, अखेर फोटोग्राफरला अजून काय दिसणार. फेसबुक लाइव्ह, वर्क फ्रॉम होम करणारा एकनाथ शिंदे नाही, अशा तिखट शब्दांत शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. बाळासाहेबांच्या नंतर कट्टर शिवसैनिकांना बाहेर काढण्याचे काम यांनी केले. त्यामुळे हे पक्षप्रमुख नाही तर कारस्थान करणारे कटप्रमुख आहेत, अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. आगामी निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकवायचा असून कार्यकर्त्यांनी कामाला लागा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी’ घोषणांनी नेस्को सेंटर दणाणून गेले.
बळीराजा संकटात आहे, मराठवाड्यासह अन्य ठिकाणी जिल्हाधिकारी, पदाधिकाऱ्यांना तिकडेच थांबून संकटात सापडलेल्यांना मदत करा, असे आवाहन केले असून ते मदत करत आहेत. २६ प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू दिल्या, बहिणींना साड्या दिल्या. आधी मदत केली, नंतर गेलो. बळीराजा संकटात आहे, डोळ्यात अश्रू आहेत, जमीन खरडून गेली, घरांची पडझड झाली, बांधावर जाऊन आलो, बळीराजाचे दुःख डोळ्यांनी पाहिले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी गुरुमंत्र दिला की संकटात सापडलेल्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. त्यामुळे ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण करतोय. जिथे संकट, आपत्ती तिथे शिवसेना उभी, संकटसमयी एकनाथ शिंदे धावून गेल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
मुंबई महापालिका ओरबडली गेली कुठे मुंबई महापालिकेत फक्त अन् फक्त भ्रष्टाचार केला, तिजोरी रिकामी केली, ३० वर्षे मुंबई महापालिका ओरबाडून घेतली गेली कुठे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पीएम केअर योजना कोविडसाठी होती हेही कळत नाही. कोविड काळातील ६०० कोटी रुपये तुम्ही काय केले, असा पलटवार शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
आज बैठकीत निर्णय
अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला असून बळीराजाला मदत सुरु असून आणखी मदत कशा प्रकारे करता येईल यासाठी उद्या शुक्रवारी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्याची बैठक होणार असून त्यात भरीव मदत करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे ही ते म्हणाले.
दिवाळीपूर्वीच मदत देणार
धीर सोडू नका तुमचे भाऊ आहेत, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. उद्धव ठाकरेंनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली, त्यावरही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. 'खुद को चाहिए काजू बदाम, पानी में उतरे तो सर्दी जुकाम', अशी शायरी म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. डीसीएम म्हणजे डेडिकेट टू कॉमन मॅन, द्यायला दानत लागते, ही लेना नाही देना बँक आहे, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
मोदींनी १० लाख कोटी रुपये दिले
महाराष्ट्रात ७० वर्षे राज्य केले त्यांनी ७० वर्षांत २ लाख कोटी रुपये दिले. तर २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि तेव्हापासून महाराष्ट्रासाठी देत आहेत. २०१४ ते आतापर्यंत १० लाख कोटी रुपये दिले, असेही ते म्हणाले.