शिंदे-ठाकरे दिल्लीत, जोरदार चर्चा गल्लीत! शिंदेंनी घेतली पंतप्रधान मोदी, अमित शहांची भेट; उद्धव ठाकरेंची राहुल गांधी, शरद पवारांशी चर्चा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, एकनाथ शिंदे यांच्या सेना मंत्र्यांची बेताल वक्तव्ये अशा विविध विषयांवर महाराष्ट्रातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची राज्यात कोंडी होत असल्यामुळे गेल्या काही दिवसांत शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे तिसऱ्यांदा दिल्लीत पोहोचले आहेत.
शिंदे-ठाकरे दिल्लीत, जोरदार चर्चा गल्लीत! शिंदेंनी घेतली पंतप्रधान मोदी, अमित शहांची भेट;  उद्धव ठाकरेंची राहुल गांधी, शरद पवारांशी चर्चा
Published on

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, एकनाथ शिंदे यांच्या सेना मंत्र्यांची बेताल वक्तव्ये अशा विविध विषयांवर महाराष्ट्रातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची राज्यात कोंडी होत असल्यामुळे गेल्या काही दिवसांत शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे तिसऱ्यांदा दिल्लीत पोहोचले आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निमंत्रणावरून शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेसुद्धा दिल्लीत आहेत. त्यामुळे दिल्लीत सध्या राजकीय बैठकांचे सत्र सुरू आहे.

एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर बंद दाराआड चर्चा केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसह वेगवेगळ्या मुद्यांवर शिंदेंनी अमित शहा यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेत चर्चा केली. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह देशातील बड्या नेत्यांशी संवाद साधला. दोन्ही शिवसेनेचे प्रमुख नेते दिल्लीत डेरेदाखल झाल्याने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुप्त संघर्ष सुरु असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. फडणवीस यांच्या अनेक निर्णयांमुळे शिंदेसेनेची अस्वस्थता वाढली आहे. शिंदे यांचे दिल्ली दौरेही वाढले आहेत. गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी सातत्याने होत आहेत. बुधवारीही दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीतील चर्चेचा तपशील समोर आला आहे.

महायुती सरकारमधील मंत्री त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे गेल्या काही महिन्यांत चर्चेत राहिले. याबद्दलही शिंदे आणि शहा यांच्या भेटीत सविस्तर चर्चा झाली. महायुती सरकारमधील मंत्र्यांनी तोंडाला आवर घालायला हवा. वादग्रस्त विधाने करणाऱ्या मंत्र्यांना समज द्यायला हवी. अन्यथा याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बसेल, अशी चिंता शहांनी व्यक्त केली अशी चर्चा आहे.

महायुतीमधील सर्वाधिक वादग्रस्त मंत्री शिंदेसेनेचेच आहेत. संजय शिरसाट, भरत गोगावले, योगेश कदम, दादा भुसे हे मंत्री वेगवेगळ्या वादात सापडले आहेत. त्यामुळे महायुती सरकार अनेकदा अडचणीत आले आहे. विशेष म्हणजे या मंत्र्यांवर शिंदेंनी कोणतीही कारवाई केलेली नाही. उलट ते त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. त्यामुळे शहांच्या सल्ल्यानंतर शिंदे मंत्र्यांवर कारवाई करणार का, हा प्रश्न आहे.

दिल्ली दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांसह बुधवारी दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. “देशाच्या इतिहासात सलग २,२५८ दिवस सेवा देणारे अमित शहा हे पहिले गृहमंत्री ठरले. यानिमित्त भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. ३७० कलम रद्द करून वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणारे, ‘ऑपरेशन महादेव’च्या माध्यमातून दहशतवाद्यांचा खात्मा करणारे, देशातील नक्षलवादाचा बीमोड करणारे आपण सक्षम गृहमंत्री आहात. सहकारापासून समृद्धीचा ध्यास घेत देशाच्या प्रगतीचा निर्धार करणारे कार्यकुशल, दृढ निश्चयी नेते आहेत,” अशा शब्दांत शिंदे यांनी अमित शहा यांना शुभेच्छा दिल्या.

...त्यामुळेच शिंदे यांच्या दिल्लीवाऱ्या वाढल्या

सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती व्यक्त केली जात असल्यानेच शिंदे यांच्या दिल्लीवाऱ्या वाढल्याची चर्चाही रंगली आहे. सुप्रीम कोर्टाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत निकाल दिल्यानंतर पुढची रणनीती काय असेल हे ठरवावे लागणार आहे. निकालाची वेळ थोडी टळली आहे, परंतु ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे.

फडणवीस यांच्याशी मतभेद असल्याच्या वृत्ताचे खंडन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेतचे वाढलेले मतभेद हे सातत्याने करण्यात येणाऱ्या दिल्लीवाऱ्यांचे कारण असल्याच्या वृत्ताचेही शिंदे यांनी जोरदार खंडन केले. आमच्यातील संबंध उत्तम आहेत आणि राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्रित काम करीत आहोत, असेही शिंदे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in