एकनाथ शिंदे, वैष्णव, इराणी दावोसला उपस्थित राहणार; जागतिक आर्थिक परिषदेस आजपासून प्रारंभ

जगातील धोरणकर्ते, अध्यक्ष, मोठमोठ्या कंपन्यांचे प्रमुख यांची पंढरी असलेल्या दावोस आर्थिक परिषदेला सोमवारपासून सुरुवात होत आहे.
एकनाथ शिंदे, वैष्णव, इराणी दावोसला उपस्थित राहणार; जागतिक आर्थिक परिषदेस आजपासून प्रारंभ

दावोस : जगातील धोरणकर्ते, अध्यक्ष, मोठमोठ्या कंपन्यांचे प्रमुख यांची पंढरी असलेल्या दावोस आर्थिक परिषदेला सोमवारपासून सुरुवात होत आहे. या परिषदेला जगभरातून २८०० विविध क्षेत्रातील नेते उपस्थित राहणार आहेत. भारतातून या परिषदेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री हरदीप पुरी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आदी उपस्थित राहणार आहेत.

५४ वी जागतिक आर्थिक परिषद सोमवारपासून सुरु होत आहे. या परिषदेला विविध देशांचे व राज्यांचे प्रमुख, विविध कंपन्यांचे सीईओ उपस्थित राहणार आहेत. तसेच पहिल्यांदाच ९० देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या परिषदेत हजर राहून युक्रेनमध्ये शांततेसाठी चर्चा करतील. तसेच इस्त्रायल-गाझा संघर्ष, वातावरण बदल, आर्थिक मंदी, कृत्रिम बुद्धीमत्तेवरून डीपफेक तंत्रज्ञान आदींवर या परिषदेत उहापोह होईल.

या परिषदेला आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास, गौतम अदानी, संजीव बजाज, कुमार मंगलम बिर्ला, एन. चंद्रशेखरन, नादीर गोदरेज, सज्जन जिंदाल, रोशनी नाडार मल्होत्रा, नंदन निलकेणी, रिषद प्रेमजी व सुमंत सिन्हा आदी परिषदेला उपस्थित राहतील.

जागतिक नेत्यांमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युल मॅक्रॉन, चीनचे पंतप्रधान ली केकियांग, युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ॲँटनी ब्लिंकेन आदी उपस्थित राहतील.

दावोसला लष्कराची सुरक्षा

दावोसला यंदा पोलीस व नागरी प्रशासनाबरोबरच ५ हजार लष्कराची सुरक्षा तैनात केली आहे. दावोसची लोकसंख्या केवळ १० हजार आहे. पण, जागतिक आर्थिक परिषदेला ३० हजार जण या शहरात उपस्थित राहणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in