शिवसेना स्वबळावर लढतेय, हलक्यात घेऊ नका; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना इशारा

शिवसेना स्वबळावर महापालिका निवडणुका लढवत आहे म्हणून तिला कुणीही हलक्यात घेऊ नये, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी इतर पक्षांना दिला. शिवसेनेला कमी लेखणाऱ्या विरोधकांना 'कात्रजचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही', असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
शिवसेना स्वबळावर लढतेय, हलक्यात घेऊ नका; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना इशारा
शिवसेना स्वबळावर लढतेय, हलक्यात घेऊ नका; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना इशाराPhoto : X
Published on

पुणे : शिवसेना स्वबळावर महापालिका निवडणुका लढवत आहे म्हणून तिला कुणीही हलक्यात घेऊ नये, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी इतर पक्षांना दिला. शिवसेनेला कमी लेखणाऱ्या विरोधकांना 'कात्रजचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही', असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

कात्रज येथे शिवसेनेच्या प्रचारासाठी आले असता माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले, 'महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना एकटी लढत आहे म्हणून आम्हाला कमजोर समजू नका. शिवसेना हा मोठा पक्ष आहे. डरपोक राजकारणाला शिवसेनेचे वाघ घाबरत नाहीत. ते बाळासाहेबांचे वाघ आहेत. ते पुढे म्हणाले, 'काही लोक स्वतःला मालक समजतात, पण आम्ही जनतेचे सेवक आहोत. एकदा आपटले की पुन्हा उठता येणार नाही, हे लक्षात ठेवा. शिवसेना केवळ ठाण्यापुरती मर्यादित नाही, तर चांदा ते बांदापर्यंत आहे, हे आम्ही दाखवून दिले आहे.'

शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मी आजही स्वतःला कार्यकर्ता समजतो. मुख्यमंत्री, आमदार, महापौर असलो तरी नेतृत्व डोक्यात जाऊ देऊ नये. कार्यकर्ताच आपला खरा पाठीचा कणा आहे. त्यांना मान-सन्मान मिळायलाच हवा, असे शिंदे म्हणाले.

घरपट्टीबाबत बोलताना शिंदे म्हणाले, नगरविकास खाते माझ्याकडे आहे. घरांची प्रॉपर्टी टॅक्स कमी करू. ‘बघतो-करतो’ असे आमचे काम नाही, रिझल्ट ऑन द स्पॉट देणारे काम आम्ही करतो. ट्राफिकमुक्त पुणे व कात्रजसाठी नगरविकास खात्याच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी आश्वासन दिले.

विकास हाच आमचा अजेंडा

या निवडणुकीत आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन उतरलो आहोत. सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवणे हेच आमचे ध्येय आहे, असे सांगत शिंदे यांनी विविध विकासकामांचा उल्लेख केला. चांदणी चौकातील वाहतूककोंडीचा प्रश्न तातडीने सोडवण्यात आल्याचे सांगून त्यांनी कात्रज परिसरातील वाहतूक समस्या देखील लवकरच दूर केली जाईल, असे आश्वासन दिले.

‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही

मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली. अनेकांनी विरोध केला, पण तुमचा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा होता. त्यामुळे ही योजना सुरू झाली. कोणीही आले तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे ठाम शब्दांत त्यांनी सांगितले. एकदा मी कमिटमेंट दिली की, मग स्वतःचंही ऐकत नाही, असे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

logo
marathi.freepressjournal.in