
मुंबई : ज्यांना जायचेय त्यांनी जा, असे वारंवार बोलणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गळती लागली असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार ‘इन कमिंग’ सुरू आहे. आता ठाकरेंच्या शिवसेनेचे कट्टर समर्थक राजापूर विधानसभा मतदारसंघात तीन टर्म आमदार असलेल्या राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे धनुष्यबाण गुरुवारी हाती घेतले आहे. त्यामुळे तळकोकणात शिंदेंची पकड मजबूत झाली असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, राजापूर विधानसभा मतदारसंघात शिंदेंचा दबदबा निर्माण झाला आहे. कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडू लागल्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना आपला हा बालेकिल्ला राखणे कठीण जाणार आहे.
शिवसेना म्हणजे कोकण असे समीकरण मानले होते. बहुतांश कोकणवासी शिवसेनेशी घट्ट जोडले गेले होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक अशी कोकणवासीयांची ओळख होती. मात्र, जुलै २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आणि स्वतःची शिवसेना स्थापन केली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिल्याने शिंदेंच्या शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यात गेल्या अडीच वर्षांत शिंदेंनी मुख्यमंत्रीपदावर असताना घेतलेल्या निर्णयांमुळे शिंदेंच्या शिवसेनेत येणाऱ्यांचा ओघ वाढला आहे. ईडी, सीबीआयची टांगती तलवार यामुळे अनेकांनी ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. आता कोकणातील ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनीदेखील गुरुवारी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची कोकणातील ताकद वाढली आहे. पक्ष प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना ‘कोकणातील ढाण्या वाघ’ असे संबोधत हा वाघ पुन्हा शिवसेनेच्या गुहेत आला, अशा शब्दात राजन साळवी यांचे स्वागत केले. ‘त्यांच्या विचाराला लागली वाळवी, म्हणून इकडे आले राजन साळवी’, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. “आपली शिवसेना ही कार्यकर्त्यांची, आनंद दिघे यांची, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची असून हा वारसा आम्ही पुढे घेऊन जात आहोत. त्यात कोकणातील शिवसेना नेते राजन साळवी शिवसेनेत आल्याने मोठा आधार मिळणार आहे, असे शिंदे म्हणाले.
वाट चुकलेला स्वगृही परतला - राजन साळवी
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन साळवी हे गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजप किंवा शिंदेंच्या शिवसेनेत ते प्रवेश करणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, गुरुवारी राजन साळवी यांनी ठाण्यातील ‘आनंद आश्रम’ येथे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ‘एकनाथ शिंदे गुरू असून, वाट चुकलेला माणूस पुन्हा कुटुंबात आला’, अशी भावना राजन साळवी यांनी यावेळी व्यक्त केली.
मी उद्धव ठाकरेंसोबतच - वैभव नाईक
राजन साळवी पक्ष सोडत असताना त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. राजन साळवी हे जुने शिवसैनिक आहेत. उद्धव ठाकरेंसोबत राहा. आज वेळ जरी वाईट असली तरी पुन्हा आपली वेळ येईल. पुन्हा आपण कार्यकर्त्यांना उभे करूया. तुमच्यासारखे कार्यकर्ते हे सत्ता आणि पदासाठी कधीही नव्हते आणि यापुढे नसणार आहेत, असे मी त्यांना समजावल्याचे शिवसेना नेते वैभव नाईक म्हणाले. राजन साळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला तो त्यांचा निर्णय आहे. मात्र, मी आजही ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर आहे आणि पुढेही बरोबर राहणार, अशी ग्वाही वैभव नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
रवी डोळस यांची हकालपट्टी
रत्नागिरी जिल्ह्याचे समन्वयक रवी डोळस यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उबाठातून त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे प्रसिद्धपत्रक शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी जारी केले आहे.