Sanjay Raut : संजय राऊत फाटक्या तोंडाचे; शिंदे गटाच्या या आमदाराने केली सडकून टीका

जामीनावरून बाहेर आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे पुन्हा सातत्याने शिंदे- फडणवीस सरकारवर टीका करत आहेत
sanjay raut
sanjay rautANI

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे जामीनवरून बाहेर आले आणि त्यांनी पुन्हा एकदा जाहीरपणे शिंदे-फडणवीस सरकारविरुद्ध टीका करण्यास सुरुवात केली. दरम्यान, खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्यामध्ये चांगलाच वाद पेटला आहे. शिंदे गटातील आमदारांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी माध्यमांसमोर केली होती. यावर आमदार संजय गायकवाड यांनी, 'संजय राऊत हे फाटक्या तोंडाचे आहेत' अशा तिखट शब्दात टीका केली आहे.

खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना संजय गायकवाड म्हणाले की, "आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा बाळ जन्माला येते, तेव्हा त्याच्या पाचवी पूजेदिवशी बाळाच्या तोंडात गोड मधाचं बोट फिरवलं जातं. हे लहान बाळ आयुष्यभर गोड बोलावं असा हेतू त्यामागे असतो. पण मला वाटतं संजय राऊत यांच्या मातोश्री नेमके हे विसरल्या. त्यामुळे संजय राऊतांची जीभ सारखी फडफड करते आणि ते बेताल वक्तव्य करत असतात." अशी टीका त्यांनी केली आहे. पुढे, " आमच्यावर गद्दारी केल्याचा आरोप नव्हे, तर आम्ही उठाव केल्याचा अभिमान आमच्या पुढच्या पिढ्यांना वाटणार आहे. त्यामुळे संजय राऊतांनी यापुढे अशी भाषा वापरू नये. राहिला प्रश्न आम्ही लढायचे की पडायचे, तर आमचा निर्णय जनतेला मान्य आहे. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली हातमिळवणी जनतेला मान्य नाही. शिवसेना-भाजप म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिले होते”, असा टोलाही त्यांनी लगावला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in