
मुंबई : महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड बहुमताने यश मिळालेले असतानाही निकालानंतर चार दिवस उलटले असले तरी त्यांना सरकार स्थापन करता आलेले नाही. महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच मंत्री दीपक केसरकर, दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी हे उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. राजीनामा देताना महायुतीकडून अद्याप राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला नाही. राजीनाम्यानंतर नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे काय जबाबदारी असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
“महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला. या मोठ्या विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आमचे सरकार स्थापन होईल. महाआघाडी म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढवली आणि आजही सोबत आहोत. त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ ‘वर्षा’ बंगल्याबाहेर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी एकत्र येऊ नये,” असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सकाळी एका पोस्टद्वारे केले आहे.
राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाल्यामुळे त्यांच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. निकालानंतर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपापले गटनेते जाहीर केले आहेत. मात्र, भाजपने अद्याप गटनेता जाहीर केला नसल्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री कोण? याबाबतचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, अशी दाट शक्यता आहे. मात्र, शिंदे गटाकडूनही एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जात आहे.