

मुंबई : राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एल निनो’चे संकट अधिक तीव्र होत जाणार असल्याच्या शक्यतेला दुजोरा दिला आहे. एल निनोमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अभ्यास करण्यात येणार असून फेब्रुवारी अखेरपर्यंत हे संकट उच्चांक पातळी गाठण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्राधान्याने पूर्ण करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात येत असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सरकारने ज्या दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली आहे, त्यामध्ये नाव नसलेल्या तालुक्यांच्या अडचणी सुद्धा आम्ही दूर करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत दुष्काळ आणि एल निनो या विषयांवर भाष्य केले. “एल निनो अजून तीव्र होत जाणार आहे. फेब्रुवारीनंतर त्याची तीव्रता कमी होईल. अशा पद्धतीचे पॅसिफिक ओशन हीटिंग असते त्यात फेब्रुवारीनंतर शिथिलता यायला सुरू होईल. त्यामुळे आपल्याला सगळ्या प्रकारच्या तयारीत राहावे लागेल. एल निनोचा परिणाम वाढला तर आपल्याला ज्या अडचणी येतील, त्यासाठी तयारीत राहावे लागेल,” असे फडणवीसांनी स्पष्ट केले.
“२६५ तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या तालुक्यात सरसकट मदतीसह १२ उपाययोजना तातडीच्या आहेत, त्यांना मान्यता दिली आहे. पुढची कारवाई सुरू केली असून पंचनामे सुरू केले आहेत. योग्य मदतीसाठीची प्रक्रिया वेगाने करत आहोत. मोजक्या तालुक्यांची नावे या यादीत नाहीत. त्या ठिकाणी देखील पाहणी होईल. तेथील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ट्रिगर-३ अंतर्गत समावेश करणार आहोत. कोणताही शेतकरी सुटणार नाही, हे सरकारने ठरवले, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, “प्रत्येक जिल्ह्याचा आराखडा करायला सांगितला आहे. साधारणपणे उपलब्ध साठ्यातील पाणी हे जुलै, ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरेल, इतके पाणी ठेवून, जिथे जास्त पाणी असेल, तेथील पाणी दुसरीकडे वापरता येईल. ते वाया घालवता येणार नाही. काही मोठ्या धरणात अधिक पाणी आहे. तिथे जुलै, ऑगस्टपर्यंत पाणी आरक्षित पाणी ठेवून उर्वरित पाणी हे रब्बी हंगाम, कारखान्यासाठी देण्याचा विचार करू शकतो. त्यामुळे सरसकट भूमिका न घेता त्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या पाण्याच्या उपलब्धतेच्या आधारावर हे निर्णय झाले पाहिजे,” असे मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.
खर्च कमी करा, दुष्काळग्रस्तांना मदत करा
दुष्काळाच्या परिस्थितीत प्रत्येकाने संवेदनशीलता दाखवून अनावश्यक खर्च टाळावा, तसेच उपलब्ध पाण्याचे नियोजन करून भविष्यातील पाणीटंचाईला सामोरे जाण्याची तयारी करावी. थोडा खर्च कमी करणे किंवा आवश्यक गोष्टींवरच खर्च करणे गरजेचे आहे, काही आवश्यक बाबींवरील खर्च करावाच लागतो. मात्र, ज्या गोष्टी टाळता येऊ शकतात किंवा कमी प्रमाणात करता येऊ शकतात, त्या कमी कराव्यात. त्यातून होणारी बचत दुष्काळग्रस्तांसाठी मदतीच्या स्वरूपात वापरता येऊ शकते. इतर स्वरूपाची मदतही नागरिकांनी करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय -फडणवीस
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा ‘फेक नरेटिव्ह’ पूर्णपणे उघडा पडला असून ते संवैधानिक संस्थांना बदनाम करून देशात अतिडावी राजवट आणण्याचा आणि अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते वोट चोरी म्हणताहेत, पण यांचा मेंदू चोरीला गेलेला आहे. यांचा चोरीला गेलेला किंवा गहाण ठेवलेला मेंदू परत आणण्यासाठी एखादी कमिटी स्थापन करण्याची विनंती मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करेन, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
काँग्रेसचा महायुती सरकारवर हल्ला
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेला असताना, काँग्रेसने रविवारी डेटा-सेंटर उद्योगाचा आक्रमकपणे विस्तार करण्याच्या धोरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या विस्तारासाठी राज्यातील पाणीसाठा शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांऐवजी दुसरीकडे वळवला जाणार नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी काय योजना आहे, असा सवाल काँग्रेसने विचारला आहे. काँग्रेसच्या प्रसार आणि प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेडा यांनी सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ घोषित केला आहे. हे अशा वेळी घडत आहे जेव्हा महाराष्ट्र आपल्या डेटा-सेंटर उद्योगाचा आक्रमकपणे विस्तार करत आहे.