विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

विधान परिषदेच्या ११ जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम विधिमंडळ सचिवालयातर्फे सोमवारी जाहीर करण्यात आला.
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
Published on

मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम विधिमंडळ सचिवालयातर्फे सोमवारी जाहीर करण्यात आला. त्यानुसार २ जुलैपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज सादर करता येणार असून १२ जुलै रोजी आवश्यकता असेल तर निवडणूक घेतली जाईल, असे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव आणि निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांनी जाहीर केले. मात्र, ही निवडणूक बिनविरोधच होण्याची शक्यता जास्त आहे.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे जाहीर करण्यात आलेल्या पत्रकानुसार निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे, उपसचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उमेश शरद शिंदे, अवर सचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सीमा सचिव तांबे यांच्याकडे २ जुलैपर्यंत कोणत्याही दिवशी (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहेत.

या अर्जांची छाननी ३ जुलै रोजी दुपारी १२ वाजता विधानभवन येथे करण्यात येईल. तसेच उमेदवारी मागे घेण्याबाबतची सूचना उमेदवाराला किंवा ती सूचना देण्याचे लेखी अधिकार उमेदवारांकडून देण्यात आलेल्या त्याच्या कोणत्याही सूचकामार्फत किंवा त्यांच्या निवडणूक एजंटला या अधिकाऱ्यांकडे त्यांच्या कार्यालयात ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत देता येईल. त्याचप्रमाणे, निवडणूक लढविली गेल्यास १२ जुलै रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in