राज्यातील सर्व मंदिर स्वच्छ करणार, ठाण्यातील मंदिरांना विद्युत रोषणाई करा; राममंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिराच्या साफसफाईंची सुरूवात आज (शनिवा) ठाण्यातील प्राचीन असलेल्या कौपिनेश्वर मंदिरापासून केली.
राज्यातील सर्व मंदिर स्वच्छ करणार, ठाण्यातील  मंदिरांना विद्युत रोषणाई करा; राममंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सूचना

ठाणे : राज्यातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता करा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिराच्या साफसफाईंची सुरूवात आज (शनिवार, 13 जाने) ठाण्यातील प्राचीन असलेल्या कौपिनेश्वर मंदिरापासून केली. मुख्यमंत्र्यांनी स्वत: हातात झाडू घेवून व तद्नंतर पाण्याने मंदिराच्या सभामंडपाची तसेच परिसराची साफसफाई केली. तसेच 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतील सर्व मंदिरे साफ करुन मंदिराना विद्युत रोषणाई करण्याच्या सूचनाही त्यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांना दिल्या. तसेच टप्याटप्याने राज्यातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहिम हाती घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ठाणे महानगरपालिकेच्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत (Deep Cleaning Campaining) अंतर्गत आज नौपाडा-कोपरी प्रभाग समितीतील सर्व विभागांमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत शिंदे यांनी सहभाग घेवून ठाणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक अशा कौपिनेश्वर मंदिरापासून मंदिराच्या साफसफाईला सुरुवात केली.

मुंबई ठाणे परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहिम राबविल्यामुळे मुंबई ठाण्यातील प्रदुषणाचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच, केंद्र सरकारने राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते महाराष्ट्राला स्वच्छतेतील प्रथम क्रमांक देवून गौरविले आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. मुंबई ठाण्यातील सर्वंकष स्वच्छता मोहिमेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांबरोबरच महापालिकेचे अधिकारी कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिक, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक सहभागी होत असून ही मोहिम न राहता ती लोकचळवळ निर्माण करावयाची असल्याने या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.

logo
marathi.freepressjournal.in