
पुणे : सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे वृद्धापकाळाने पुण्यातील निवासस्थानी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने वैज्ञानिक आणि साहित्यिक जगतात मोठी पोकळी निर्माण झाली असून खगोलशास्त्रातील तेजस्वी तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे. खगोलशास्त्रातील त्यांचे महत्त्वपूर्ण संशोधन आणि विज्ञानाचा सामान्यांपर्यंत प्रसार करण्याचे कार्य कायम स्मरणात राहील. डॉ. नारळीकर हे ‘हॉईल-नारळीकर सिद्धांत’ मांडणारे एक थोर भौतिकशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. ते ब्रह्मांडाच्या स्थिर स्थितीच्या सिद्धांताचे अभ्यासक होते.
कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी एका सुशिक्षित कुटुंबात जन्मलेल्या डॉ. नारळीकर यांचे शालेय शिक्षण बनारस येथे झाले. त्यांचे वडील प्रा. विष्णू वासुदेव नारळीकर हे बनारस हिंदू विद्यापीठात गणिताचे विभागप्रमुख होते, तर आई संस्कृत पदवीधर होत्या. लहानपणापासूनच त्यांना गणित आणि विज्ञानाची आवड होती. १९५९ मध्ये त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून गणित आणि खगोलीय पदार्थ विज्ञान विषयात बीएससी पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले, जिथे केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी एमएससी पदवी प्राप्त केली.
केंब्रिज विद्यापीठामध्ये त्यांनी जगप्रसिद्ध प्राध्यापक फ्रेडरिक हॉईल यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी केली. १९५७ ते १९६२ या काळात ते केंब्रिजमध्ये होते. वयाच्या २२ व्या वर्षी ते रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सदस्य बनले. तसेच किंग्स कॉलेज, केंब्रिजचे फेलो म्हणूनही त्यांची निवड झाली. १९६६ मध्ये त्यांचा विवाह गणितज्ज्ञ मंगला राजवाडे यांच्याशी झाला. मंगला नारळीकर ह्या त्यांच्या वैज्ञानिक आणि साहित्यिक कार्यात सहकारी होत्या. मंगला नारळीकर यांचे २०२३ मध्ये निधन झाले.
१९७२ मध्ये भारतात परतल्यानंतर जयंत नारळीकर यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत (टीआयएफआर) प्राध्यापक म्हणून कार्य केले. १९८८मध्ये त्यांनी पुण्यात आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोल-भौतिकी केंद्र आयुका (IUCAA) स्थापन केले. ते २००३ पर्यंत या संस्थेचे संचालक होते. १९९४ ते १९९७ दरम्यान ते आंतरराष्ट्रीय खगोलीय संघाच्या कॉस्मॉलॉजी कमिशनचे अध्यक्ष होते. २०२१ साली नाशिक येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.
डॉ. नारळीकर यांनी आपल्या संशोधनातून अनेक महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या पीएचडी प्रबंधात गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आणि सृष्टीच्या निर्मितीसारख्या विषयांचा समावेश होता. त्यांनी विश्वाच्या स्थिर स्थितीचा सिद्धांत मांडून खगोलशास्त्रात एक वेगळी दृष्टी दिली. हॉईल यांच्यासोबत त्यांनी गुरुत्वाकर्षण-सदृश्य सिद्धांत सादर केला, ज्याने विश्वोत्पत्तिशास्त्रात महत्त्वाचे योगदान दिले.
डॉ. नारळीकर यांनी विज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये विपुल लेखन केले. त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकांमध्ये ‘अभयारण्य’, ‘वामन परत ना आला’, ‘अंतराळ’, ‘भस्मासूर’, ‘व्हायरस’, ‘चला जाऊ अवकाश सफरीला’ यांचा समावेश होतो. ‘चार नगरात माझे विश्व’ आणि ‘पाहिलेले देश, भेटलेली माणसे’ ही त्यांची आत्मचरित्रे आहेत. 'चार नगरांतले माझे विश्व' या त्यांच्या मराठी आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. तर 'यक्षाची देणगी' या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला. याशिवाय अमेरिकेतील एका संस्थेने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले.
जनसामान्यांना विज्ञानातील गूढ रहस्य कळावीत म्हणून डॉ. नारळीकर यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतून विज्ञान साहित्याची निर्मिती केली. विविध मराठी नियतकालिकांतून त्यांचे विज्ञानविषयक ललित लेखन सातत्याने प्रसिद्ध होत. या माध्यमातून त्यांनी देशभरात विज्ञान जागृतीची ज्योत पेटवली. त्यांची पुस्तके जगातील विविध भाषांमध्ये भाषांतरित झालेली आहेत. जयंत नारळीकर यांनी लिहिलेल्या मराठी विज्ञानकथांमुळे लहान मुलांमध्ये विज्ञानाची रूची निर्माण झाली. त्यांच्या सहजसोप्या आणि अभ्यासपूर्ण विज्ञानकथांचं गारूड वाचकांच्या तीन पिढ्यांवर कायम आहे.
पद्मसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित
भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये ‘स्मिथ पुरस्कार’, ‘ॲॅडम्स पुरस्कार’, ‘शांती स्वरूप भटनागर पुरस्कार’, ‘इंदिरा गांधी पुरस्कार’, ‘कलिंग पुरस्कार’ आणि ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ यांचा समावेश आहे. त्यांना ‘पद्मभूषण’ (१९६५) आणि ‘पद्मविभूषण’ (२००४) यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनीही गौरवण्यात आले.
आयुका संस्थेची स्थापना
डॉ. नारळीकर यांनी पुण्यात ‘आयुका’ (IUCAA) या संस्थेची स्थापना केली, जी आजही देशातील खगोलशास्त्रज्ञांना मार्गदर्शन करत आहे. त्यांच्या निधनाने भारतीय विज्ञान क्षेत्रातील एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा अस्त झाला आहे.
शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक, महाराष्ट्र भूषण डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून डॉ. नारळीकर यांच्यावर बुधवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विविध क्षेत्रातील मान्यवरांची आदरांजली
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. नारळीकर यांच्या अतुलनीय योगदानाला आदरांजली वाहत, अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनामुळे विज्ञान क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाल्याचे म्हटले आहे.