तुरुंगांची संख्या वाढवण्यावर भर! कारागृह महासंचालक अमिताभ गुप्ता यांचे मत

तुरुंगांची संख्या वाढवण्यावर भर! कारागृह महासंचालक अमिताभ गुप्ता यांचे मत

कैदी हे सुद्धा समाजाचा महत्त्वाचा भाग असल्याने त्यांच्या मानवी पैलूंकडेही गांभीर्याने लक्ष दिले जात आहे

कारागृहाच्या सुधारणेबाबत यापूर्वीही प्रयत्न झाले आहेत. मात्र कैद्यांच्या तुलनेत तुरुंगांची संख्या कमी आहे, ती वाढवण्यासाठी आम्ही ठोस पुढाकार घेतला आहे, त्याचा परिणाम लवकरच दिसून येईल. कैदी हेसुद्धा समाजाचा महत्त्वाचा भाग असल्याने त्यांच्या मानवी पैलूंकडेही गांभीर्याने लक्ष दिले जात आहे. आता मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर कारागृह सुधारणांबाबत सर्व बाबींची अंमलबजावणी जलद गतीने होईल, असे मत वरिष्ठ आयपीएल अधिकारी आणि राज्याचे कारागृह महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केले.

गुप्ता यांच्याशी राज्यातील सध्याच्या कारागृहांबाबत घेतलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक विषयांवर संवाद साधला. ते म्हणाले की, “कारागृहातील कैद्यांना एकटेपणा जाणवू नये, तसेच ते नैराश्यात जाऊ नये, यासाठी कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधता यावा, असा प्रयोग राबवण्यात आला आहे. हा प्रयोग यशस्वी झाला, त्यात कोणताही गडबड झाली नाही तर हा उपक्रम यापुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे. या उपक्रमात गैरवापर होऊ नये, यासाठी विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. मानवी पैलू डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा निर्णय घेतला आहे.”

“कारागृहातील काही कैदी मोबाईल फोनवरून फोन करत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे कारागृहातून बेकायदेशीर कॉल करणाऱ्या कैंद्यांविरुद्ध कठोर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना राज्यातील सर्व तुरुंग अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये याबाबत कारवाई करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

“तुरुंगातील कैद्यांना सकस अन्न देण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच तुरुंगातील पायाभूत सुविधांबाबत कृती आराखड्याचे काम चांगल्या पातळीवर सुरू आहे. याबाबत लवकरच प्रशासकीय पातळीवर ठोस पावले उचलली जातील. काही जिल्ह्यांमध्ये कैद्यांना संगणक प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही उपक्रम सुरू केला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम समोर येताच, आयटी विभागाच्या मदतीने इतर जिल्ह्यांमध्येही कैद्यांच्या विकासासाठी काम केले जाईल,” असेही अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

महिलांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष

तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या पुरुषांप्रमाणेच महिला कैद्यांच्या प्रगतीसाठी आम्ही विशेष प्रयत्न घेत आहोत. महिलांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यानुसार काम सुरू झाले आहे. राज्यातील तुरुंग आणि कैद्यांचे राहणीमान, तसेच कैद्यांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून या कामात आम्हाला नक्कीच यश मिळेल, असा विश्वास असल्याचेही अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in