जरांगेंच्या दादागिरीला आवर घालणार की नाही? भुजबळांचा विधानसभेत संतप्त सवाल

मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यायचे विधेयक मंजूर केले तरी मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन सुरूच आहे. त्यांच्यावर काही बोलले तर ते मला धमकी देणार. याला टपकवीन, त्याला टपकवीन, असे त्यांचे सुरू आहे...
जरांगेंच्या दादागिरीला आवर घालणार की नाही? भुजबळांचा विधानसभेत संतप्त सवाल

मुंबई : मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यायचे विधेयक मंजूर केले तरी मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन सुरूच आहे. त्यांच्यावर काही बोलले तर ते मला धमकी देणार. याला टपकवीन, त्याला टपकवीन, असे त्यांचे सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याखाली बसून ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आईवरून शिव्या देतात. महसूल आयुक्त, एसपी, कलेक्टर यांना ते शिव्या देतात. त्यांची जी ही दादागिरी सुरू आहे, त्यावर आवर घालणार की नाही, असा संतप्त सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत केला. त्यावर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, छगन भुजबळ यांनी त्यांना जीवाची भीती असल्याची भावना व्यक्त केली त्याची गंभीर दखल आपण घेत असून शासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दिले.

मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने विधानसभेत मंजूर झाले. त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. ओबीसी मुद्द्यावरून आक्रमक असलेले छगन भुजबळ या विधेयकावर काहीतरी बोलतील, अशी अटकळ होती. मात्र या विधेयकावर कोणतीही चर्चा होणार नाही, असे आधीच ठरले होते. विधेयक मंजूर झाले तेव्हा छगन भुजबळ यांनी बोलायची इच्छा व्यक्त केली. अध्यक्षांनी त्यांना परवानगी दिली. मराठा आरक्षणाच्या विधेयकाला आपला विरोध नाही तर पाठिंबाच असल्याचे सांगत छगन भुजबळ म्हणाले, “ज्या मनोज जरांगेंचा उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला ते सतत धमक्या देत आहेत. याला टपकवीन, त्याला टपकवीन. मलाही धमक्या दिल्या. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आईवरून शिव्या दिल्या. महसूल आयुक्त, एसपी, कलेक्टर यांना शिव्या देतात. या दादागिरीला कोणी आवर घालणार आहे की नाही. त्यांनी २७ तारखेला गुलाल उधळला. पण १० तारखेला ते परत उपोषणाला बसतात. राज्यात भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. हे थांबायला पाहिजे,” अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. जरांगे-पाटील यांच्यासोबतचे भंडारा डोंगरावरचे अजय महाराज बारस्कर यांनी जरांगे यांचा स्वभाव स्पष्ट करून सांगितला आहे. ही व्यक्ती ऐकणाऱ्यातील नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. आता आरक्षण विधेयक मंजूर करूनही ते म्हणतात उठणार नाही. म्हणजे त्यांचे आंदोलन सुरूच. त्यांचे आता म्हणणे आहे हे आरक्षण त्यांना नकोय. ओबीसीतूनच हवे, असेही छगन भुजबळ म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in