

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे नुकतीच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये अभियांत्रिकीच्या १११ विषयांमध्ये संगणक अभियांत्रिकी या अभ्यासक्रमाला सर्वाधिक २८ हजार १७० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी पसंती दर्शविली आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सर्वाधिक ६४ हजार ८२२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
राज्यातील ३८७ अभियांत्रिकी महाविद्यालयातील १११ अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी १ लाख ८१ हजार ९२७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यामध्ये १ लाख १४ हजार १२१ विद्यार्थी, तर ६७ हजार ८०६ विद्यार्थिनी आहेत. मागील वर्षी २०२५-२६ मध्ये १ लाख ६६ हजार ७४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. यानुसार मागील वर्षापेक्षा १५ हजार १८१ जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. विद्यापीठांतर्गत प्रवेशामध्ये राज्यात सर्वाधिक ६४ हजार ८२२ विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेश घेतला असून जिल्हानिहाय प्रवेशामध्येही राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ४९ हजार ६१६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
यावर्षी अभियांत्रिकीच्या १११ विषयांमध्ये संगणक अभियांत्रिकी या शाखेमध्ये सर्वाधिक २८ हजार १७० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यानंतर अनुक्रमे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सिव्हील इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ), इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्स व केमिकल इंजिनिअरिंग या शाखेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.