पोळा सणानिमित्त शेतकऱ्यांत उत्साह! छत्रपती संभाजीनगरमध्ये बैलांची आकर्षक सजावट

श्रावण महिन्यातला शेवटचा श्रावणी सोमवार आणि पोळा सण एकाच दिवशी आल्याने उत्साहाचे वातावरण होते.
पोळा सणानिमित्त शेतकऱ्यांत उत्साह! छत्रपती संभाजीनगरमध्ये बैलांची आकर्षक सजावट
Published on

सुजित ताजने/ छत्रपती संभाजीनगर

शेतात राब राब राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या पोळा सणानिमित्त सोमवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये घराघरांत मोठा उत्साह होता. सायंकाळी मिरवणुका काढून मोठ्या उत्साहात बैलांची पूजा केली. त्यासाठी रंगरंगोटी करून पाठीवर झूल, गळ्यात घुंगराची माळ घालून बैलांना सजविण्यात आले होते. काहींनी घरोघरी मातीचे बैल आणून पूजन केले.

श्रावण महिन्यातला शेवटचा श्रावणी सोमवार आणि पोळा सण एकाच दिवशी आल्याने उत्साहाचे वातावरण होते. उमर्डा बाभुळगाव येथील अरविंद भितकर या शेतकऱ्याने संगितले की, आम्ही वर्षभर पोळा या सणाची आतुरतेने वाट बघत असतो. बैलाच्या जोडीची सजावट करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून मनोभावे पूजा केली. पोया रे पोया, बैलांचा पोया। तुरीच्या दायीने, मारला हो डोया।। कांद्याने आमचे, केले हो वांदे। ऊसवाला बाप, ढसा ढसा रडे ।। एक नमन गौरा पार्बती; हर बोला, हर हर महादेव..!, या ओळी यावेळी शेतकरी परिवाराच्या तोंडातून येत होत्या.

बैलांची मिरवणूक

चिकलठाणा, फुलंब्री, सिल्लोड भागात शेतकरी बांधवांनी सर्जाराजाच्या जोडीची मिरवणूक काढली. अनेक बैलांच्या जोड्या यात सहभागी झाल्या होत्या. चिकलठाणा येथिल गावकरी मंडळींच्या वतीने काढण्यात येणारी मिरवणूक मिनी घाटी, चिकलठाणा परिसर, जालना रोड, हनुमान गल्ली, दहीहंडी गल्ली, धनगर गल्ली अशी विविध मार्गे फिरली. मिरवणूक काढून सर्जा-राजाचे पूजन करून त्यांना पूरण पोळीचा नैवेद्य देण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in