
नाशिक : समृद्धी महामार्गावर इगतपुरी बोगद्याच्या पुढे वेगवान कारचा अपघात झाला. या अपघातात कारने तीनवेळा पलटी मारली. या अपघातात उद्योजक सुनील हेकरे यांचा अपघातात मृत्यू झाला असून, त्यांची पत्नी व दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. अपघातग्रस्तांना तत्काळ वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे हेकरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. सुनील हेकरे आणि त्यांचे कुटुंबीय मुंबईहून नाशिककडे आलिशान कारमधून प्रवास करत होते. मात्र, समृद्धी महामार्गावर शहापूर हद्दीत त्यांच्या कारला अपघात झाला. त्यामध्ये उद्योजक सुनील हेकरे हे कारमधून बाहेर फेकले गेले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आणि प्रचंड रक्तस्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मृत सुनील हेकरे यांचे बंधू अनिल हेकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर अपघाताच्या ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे गाडीचा ताबा सुटून अपघात झाला. "महामार्गावरील बांधकामाची गुणवत्ता निकृष्ट असून, अपघातानंतर वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली नाही," असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.