
मुंबई : तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला, त्यावेळी केंद्र सरकारने ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तमिल’ची स्थापना केली. यामुळे तमिळ साहित्य, प्राचीन ग्रंथांचा अनुवाद, संशोधन याचबरोबर उच्च शिक्षणाच्या वृद्धिंगतेसाठी अनेक साधने उपलब्ध करून देण्यात आली. याच धर्तीवर मुंबईत ‘सेंट्रल युनिव्हर्सिटी फॉर मराठी स्टडीज’ची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रवींद्र वायकर यांनी लोकसभेत शून्य प्रहरावेळी केली.
भारतात मराठी भाषा ही तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. ८.३ कोटी जनता दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा वापर करते. महाराष्ट्रात १२ हजारपेक्षा जास्त मराठी ग्रंथालये आहेत, परंतु या भाषेच्या संवर्धन व संशोधनासाठी अद्याप एकही केंद्रीय विद्यालयाची स्थापना करण्यात आलेली नाही. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. ज्यामुळे मराठी साहित्य, संस्कृती आणि मराठी भाषिक जनतेसाठी निश्चितच अभिमानाची बाब असून हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे वायकर म्हणाले.
मराठी भाषेच्या संवर्धन, संरक्षण, संशोधन तसेच उच्च शिक्षणात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक सक्षमीकरण सोयीचे होणार आहे. मराठी भाषेला डिजिटल माध्यमांशी जोडण्यासाठी ई-लायब्रेरी, ऑनलाइन कोर्सेस आणि संशोधनाची सोय करणे आवश्यक आहे. यामुळे युवा पिढी तसेच संशोधनकर्ते यांना याचा लाभ मिळेल. मराठी भाषा ही मराठी माणसाच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. यासाठी सरकारला आवश्यक पावले उचलायला हवीत, अशी मागणीही वायकर यांनी यावेळी केली.